जळगावात दोन दिवसांपासून पावसाची विश्रांती; ‘अलर्ट’ असूनही उघडीप
जळगाव । मागच्या काही दिवसापासून राज्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. जळगाव जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली आहे. विशेष म्हणजे, हवामान खात्याकडून या दोन्ही दिवसांसाठी जिल्ह्यात पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला होता. मात्र, हवामान खात्याचा हा अंदाज फोल ठरला असून, पावसाने अचानक उघडीप दिल्याने जळगावकरांना उन्हाचा चटका आणि उकाड्याचा सामना करावा लागत आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पाऊस होईल अशी शक्यता होती. मात्र, आभाळ भरून येत असले तरी पाऊस पडत नसल्याने हवेतील दमटपणा कमालीचा वाढला आहे. दोन दिवसांपासून कडक ऊन पडत असल्यामुळे तापमानात वाढ झाली असून, नागरिक प्रचंड उकाड्याने त्रस्त झाले आहेत.


जुलैच्या सुरुवातीला झालेल्या दमदार पावसानंतर जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र, आता ऐन पिके उगवणीच्या काळातच पावसाने सलग दोन दिवस उघडीप दिल्यामुळे बळीराजाच्या चिंतेत भर पडली आहे. हवामान खात्याचे अंदाज बदलत असल्याने आता पुढील काही दिवस नेमके हवामान कसे राहील, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
२० जुलैपर्यंत ‘ड्राय स्पेल’चे सावट?
दरम्यान, हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार जिल्ह्यात पुन्हा पावसातील मोठ्या खंडाचा (ड्राय स्पेल) धोका निर्माण झाला आहे. येत्या २० जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता कमी असल्याने खरीप पिकांच्या भवितव्याबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.