नाशिकच्या आदिवासी आश्रमशाळेत धक्कादायक प्रकार; अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याने खळबळ!

0

नाशिक | राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना नाशिक जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. कळवण तालुक्यातील मोहनदरी येथील आदिवासी निवासी आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आश्रमशाळेतच बाळाला जन्म दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, संबंधित अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील एका अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून संशयित अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत बालसुधारगृहात पाठवले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सर्व पैलूंची चौकशी केली जात आहे.

या घटनेनंतर आदिवासी विकास विभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होत असताना विद्यार्थिनीची गर्भावस्था इतके दिवस प्रशासनाच्या निदर्शनास कशी आली नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त दिनकर पावरा यांनी घटनेला दुजोरा देत संपूर्ण प्रकरणाची खात्यांतर्गत सखोल चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी तपासाच्या दृष्टीने या प्रकरणात गोपनीयता राखली होती.

या धक्कादायक घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.