बऱ्हाणपूर ते चाळीसगाव गुटखा तस्करीचा पर्दाफाश! कारसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त; तस्करांचे धाबे दणाणले!
चाळीसगाव । मध्य प्रदेशातून जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या आंतरराज्य गुटखा तस्करीच्या रॅकेटचा चाळीसगाव शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे राबविण्यात आलेल्या धडक कारवाईत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला आणि तंबाखूची मोठी खेप जप्त करण्यात आली. या कारवाईत पाच जणांना अटक करण्यात आली असून, तस्करीसाठी वापरण्यात आलेल्या कारसह ६ लाख ५७ हजार ७८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या दिलेल्या आदेशानुसार चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी विशेष मोहीम राबवली. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी हनुमानवाडी, आनंदवाडी आणि लक्ष्मीनगर परिसरात सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.


या कारवाईत अजित चांदूमल रावलानी, कुबेर शेख कसम, हितेश किशोर पवार, निखिल राजेंद्र केसरवाणी आणि सौरभ संजय शिंगणे (सर्व रा. चाळीसगाव) यांना अटक करण्यात आली. आरोपींकडील बॅगची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा आढळून आला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांसह टाटा इंडिका (MH-18-W-7837) कार जप्त केली असून, एकूण मुद्देमालाची किंमत ६,५७,०७८ रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
प्राथमिक तपासात हा प्रतिबंधित माल मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथून चाळीसगावात तस्करी करून आणण्यात आल्याचे उघड झाले आहे. या रॅकेटमधील इतर संबंधितांचा शोध सुरू असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.