जळगाव विमानतळावरून नवी दिल्लीसाठी विमानसेवा
जळगाव । जळगावकरांसाठी गुडन्यूज आहे. जळगाव विमानतळावरून आता देशाची राजधानी नवी दिल्ली आणि मध्य प्रदेशातील प्रमुख शहर इंदूर साठी विमानसेवा सुरू होत आहे. ‘अलायन्स एअर’ या कंपनीमार्फत ही सेवा १ मे ते ३१ मे या कालावधीत प्रायोगिक तत्त्वावर चालवली जाईल. या विमानसेवेमुळे उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याची मध्य भारत व थेट दिल्लीशी ‘कनेक्टिव्हिटी’ वाढणार आहे.
जळगाव विमानतळावरून ‘फ्लाय ९१’ या विमान कंपनीकडून गोवा-पुणे, हैदराबाद अशी विमानसेवा सुरू आहे. तर ‘अलायंस एअर’ विमान कंपनीकडून मुंबई, अहमदाबाद अशी विमानसेवा सुरू आहे, आता जळगाव विमानतळावरून दिल्ली- इंदूर- जळगाव एटीआर ७२ ही विमानसेवा सुरू करणार आहे. ही सेवा सध्या मे महिन्यासाठी (१ मे ते ३१ मे) सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार ती पुढे सुरू ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाईल.


दरम्यान, जळगावहून दिल्ली जाण्यासाठी राजधानीसह इतर बऱ्याच रेल्वे गाड्या उपलब्ध आहेत. मात्र, रेल्वे मार्गे दिल्ली गेल्यास १६ ते १८ तास लागतात. विमानाने दिल्ली प्रवास केल्यानंतर प्रवाशांना जळगावहून केवळ चार तासांत दिल्ली पोहचता येणार आहे. अशाच प्रकारे जळगावहून रस्ते मार्गे इंदूर जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. मात्र, विमानाने केवळ ४० मिनिटांत इंदूर पोहचता येणार आहे.
ही सेवा सुरुवातीला आठवड्या तीन दिवस सुरू केली जाणार असून, यात मंगळवार, गुरुवार व शनिवार अशी राहणार आहे. यात दिल्लीहून दुपारी ०४.५० वाजता विमान उड्डाण घेईल आणि ०६.५० वाजता इंदूर येथे पोहचेल. तेथून रात्री ०७.१५ वाजता ते उड्डाण घेईल आणि रात्री १९.५५ जळगाव येथे पोहचेल. अशाच प्रकारे, आठवड्याचे तिन्ही दिवस जळगावहून रात्री ०८.२० वाजता विमान उड्डाण घेईल आणि ०९.०० वाजता इंदूर येथे पोहचेल. तेथून रात्री ०९.२५ वाजता ते उड्डाण घेईल आणि ११.३० वाजता दिल्लीत पोहचेल.