भोकरच्या SBI बँकेत सिनेस्टाईल दरोडा! बंदुकीचा धाक दाखवत रोकड अन् सोने लुटले;
जळगाव : तालुक्यातील भोकर येथील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) शाखेत शनिवारी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या सुमारास दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा पडल्याची खळबळजनक घटना घडली. पाच ते सहा दरोडेखोरांनी दुचाकीवरून येत बँकेत प्रवेश केला. त्यानंतर बँकेतील कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवून रोख रकमेसह सोने लुटून नेले. एवढेच नव्हे तर बँक व्यवस्थापक आणि रोखपालाला मारहाण करून खुर्चीला बांधून ठेवले.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी दुपारी बँकेत ग्राहकांची वर्दळ तुलनेने कमी होती. याच संधीचा फायदा घेत पाच ते सहा दरोडेखोर दुचाकीवरून बँकेत दाखल झाले. त्यांनी बँकेतील कर्मचाऱ्यांना शस्त्राचा धाक दाखवत धमकावण्यास सुरुवात केली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना विरोध करण्याची संधी न देता बँकेतील रोख रक्कम आणि सोने जवळील बॅगांमध्ये भरून घेतले. दरोड्यादरम्यान दरोडेखोरांनी बँक व्यवस्थापक आणि रोखपालाला मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही खुर्चीला बांधून ठेवले. बँकेतील इतर कर्मचाऱ्यांनाही बंदुकीचा धाक दाखवून दहशतीखाली ठेवण्यात आले. लुटीचा प्रकार पूर्ण केल्यानंतर सर्व दरोडेखोर दुचाकींवरून घटनास्थळावरून पसार झाले. दरोडेखोर बँकेतून पसार झाल्यानंतर घटनेची माहिती जळगाव तालुका पोलिसांना देण्यात आली. दरम्यान, दरोडेखोर जळगावच्या दिशेने पळून जात असताना डिकसाई गावाजवळ काही ग्रामस्थांना त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.


ग्रामस्थांनी त्यांना हटकले असता झालेल्या प्रकारात एक दरोडेखोर त्यांच्या ताब्यात सापडला. संतप्त ग्रामस्थांनी त्याला पकडून बेदम मारहाण केली. इतर ठिकाणी आणखी दोन दरोडेखोर पकडण्यात आले. त्यांच्याजवळील बॅगा देखील हस्तगत केल्या गेल्या.