विरोधात साक्ष दिली अन् डंपरखाली चिरडून संपवले! अमळनेर तालुक्यात थरारक हत्याकांड

0

अमळनेर : जुन्या वादातून आणि विरोधात साक्ष दिल्याच्या रागातून एका व्यक्तीला वाळूच्या भरधाव डंपरखाली ढकलून चिरडल्याची धक्कादायक घटना अमळनेर तालुक्यातील नांद्री बसस्थानकाजवळ घडली. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडलेल्या या घटनेत शरद रतन पाटील (रा. नगाव बुद्रुक) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विपुल गोसावी, मयूर बोरसे, सागर गोसावी आणि डंपरचालक भरत सुभाष पाटील अशा चौघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परता दाखवत डंपरचालकाला रात्रीच अटक केली.

जुन्या वादातून सुरू झाला होता संघर्ष

मिळालेल्या माहितीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी नगाव बुद्रुक येथे वाळूचे ट्रॅक्टर लावताना झालेल्या धक्क्यावरून ज्ञानेश्वर काळूगिर गोसावी यांचा विपुल गोसावी, सागर गोसावी आणि मयूर बोरसे यांच्याशी वाद झाला होता. यावेळी आरोपींनी ज्ञानेश्वर गोसावी आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली होती. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या दिवशी तलाठी महेंद्र पाटील यांनी या घटनेचा पंचनामा केला. यावेळी शरद रतन पाटील हे मुख्य साक्षीदार होते. विरोधात साक्ष दिल्याचा राग मनात धरून विपुल गोसावी याने शरद पाटील यांना रस्त्यात चिरडून टाकण्याची धमकी दिली होती. ग्रामस्थांनी मध्यस्थी केल्याने त्यावेळी तक्रार दाखल झाली नाही. मात्र, आरोपींनी हा राग मनात कायम ठेवला होता.

कारने कट मारून अडवले, डंपर अंगावर घातला

३१ ऑक्टोबर रोजी रात्री पोलीस पाटील प्रवीण गोसावी यांच्या वाढदिवसानिमित्त शरद पाटील आणि अन्य काही जण सावखेडा येथील देव हॉटेलमध्ये जेवणासाठी जात होते. रात्री पावणेदहाच्या सुमारास नांद्री बसस्थानकाजवळ पातोंड्याच्या दिशेने आलेल्या मारुती कारने महेश आत्माराम पाटील यांना कट मारला. काही अंतरावर कार थांबल्यानंतर त्यातून विपुल गोसावी, मयूर बोरसे आणि सागर गोसावी खाली उतरले.

त्याचवेळी पातोंड्याकडून भरधाव वेगाने आलेल्या डंपरचा चालक भरत पाटील याने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. प्रवीण गोसावी यांनी त्यांना जाब विचारला असता वाद आणखी वाढला. फिर्यादीनुसार, विपुल गोसावी याने डंपरचालकाला सर्वांना चिरडण्यास सांगितले. त्यानंतर चालकाने डंपर थेट त्यांच्या अंगावर घातला. यावेळी विपुल गोसावी आणि मयूर बोरसे यांनी शरद पाटील यांना चालत्या डंपरसमोर ढकलून दिले. तर सागर गोसावी याने चंद्रशेखर पाटील यांनाही ढकलण्याचा प्रयत्न केला.

उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू

डंपरखाली आल्याने शरद पाटील यांच्या दोन्ही पायांसह शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर चौघेही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. जखमी शरद पाटील यांना तातडीने अमळनेर येथील नर्मदा फाउंडेशनमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी धुळ्याला हलविण्यात येत होते. याचदरम्यान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच आमदार अनिल पाटील यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. उपचारासाठी त्यांनी तातडीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदतही केली. तसेच पोलीस अधीक्षकांशी फोनवर चर्चा करून आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली. यानंतर जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क झाली. दहिवद फाटा आणि पिंपळी मार्गे पळून जाणाऱ्या डंपरचा पोलिसांनी पाठलाग केला. अखेर बुधगाव येथे डंपर अडवून चालक भरत सुभाष पाटील याला रात्रीच अटक करण्यात आली. उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणाचा पुढील तपास अमळनेर पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.