ललित कोल्हेंना अखेर जामीन मंजूर!
जळगाव । जळगावमधील ममुराबाद रोडवरील ‘एल. के. फार्महाऊस’वर झालेल्या पोलीस छापेमारी प्रकरणी गेल्या अनेक महिन्यांपासून कारागृहात असलेले जळगावचे माजी महापौर ललित कोल्हे यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने कोल्हे यांचा जामीन मंजूर केला
नेमके प्रकरण काय होते?
काही महिन्यांपूर्वी जळगाव पोलिसांनी ममुराबाद रोडवरील ललित कोल्हे यांच्या मालकीच्या फार्महाऊसवर छापा टाकला होता. या ठिकाणी बेकायदेशीररीत्या कॉल सेंटर चालवून विदेशी नागरिकांची ऑनलाइन लूट केली जात असल्याचा खळबळजनक ठपका पोलिसांनी ठेवला होता. या कारवाईत कोल्हे यांच्यासह कोलकाता येथील चार मुख्य संशयित आणि इतर अशा एकूण आठ जणांना अटक करण्यात आली होती.


या गुन्ह्यात अटक झाल्यापासून ललित कोल्हे हे नाशिक मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत होते. यापूर्वी त्यांनी जिल्हा न्यायालय आणि उच्च न्यायालयात जामिनासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले होते; दोन्ही न्यायालयांनी त्यांचे जामीन अर्ज फेटाळून लावले होते. अखेर कोल्हे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. तिथे दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण
दीर्घकाळ चाललेल्या या कायदेशीर प्रक्रियेनंतर कोल्हे यांना जामीन मिळाल्याने त्यांच्या कुटुंबियांमध्ये आणि राजकीय समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर ललित कोल्हे लवकरच कारागृहाबाहेर येण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे जळगावच्या राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा रंगली आहे.