बद्रीनाथहून फाटाकडे जाणारे हेलिकॉप्टर कोसळले; ६ जण होते प्रवासात

0

उत्तराखंड : उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हेलिकॉप्टर दुर्घटनेची मोठी घटना समोर आली आहे. बद्रीनाथ धाम येथून फाटाकडे जाणारे एक हेलिकॉप्टर जोशीमठजवळ कोसळल्याची माहिती मिळत आहे. हाथी डोंगराच्या मागील बाजूस असलेल्या चायी गावाजवळ ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे. या हेलिकॉप्टरमध्ये पाच प्रवासी आणि एक पायलट असे एकूण सहा जण होते. दरम्यान, अद्याप हेलिकॉप्टरचा ढिगारा सापडलेला नसून प्रशासनाकडून शोधमोहीम सुरू आहे.

दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने शोधमोहीम

मिळालेल्या माहितीनुसार, भारत कंपनीचे हे हेलिकॉप्टर बद्रीनाथहून फाटाकडे जात होते. बद्रीनाथ आणि जोशीमठदरम्यान अचानक हेलिकॉप्टरची लोकेशन मिळेनाशी झाली. त्यानंतर संबंधित यंत्रणांनी हेलिकॉप्टरशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, संपर्क होऊ न शकल्याने स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने शोधमोहीम हाती घेतली.

या शोधमोहिमेत मदतीसाठी आणखी दोन हेलिकॉप्टर्स तैनात करण्यात आले आहेत. मात्र, परिसरात सतत सुरू असलेला पाऊस आणि दाट ढगांमुळे दृश्यमानता अत्यंत कमी झाली आहे. त्यामुळे बचाव पथकांसह हेलिकॉप्टरनाही शोधकार्यात अडचणींचा सामना करावा लागत आहे.

हेलिकॉप्टरमधील सहा जणांची नावे समोर

हेलिकॉप्टरच्या प्रवासी यादीतील माहितीनुसार, त्यामध्ये एकूण सहा जण प्रवास करत होते. यामध्ये पाच प्रवासी आणि एका वैमानिकाचा समावेश आहे. प्रवाशांची नावे चंद्रकांत, राजश्री, दिनेश, आकाश आणि अथर्व अशी आहेत. तर हेलिकॉप्टरचे पायलट हिमांशू असल्याची माहिती समोर आली आहे.

मात्र, हेलिकॉप्टरचा नेमका अपघात कसा झाला आणि त्यामधील सहा जणांची सद्यस्थिती काय आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही. हेलिकॉप्टरचा ढिगारा शोधण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

ऑक्टोबरमध्येही दोन हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग

दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात चारधाम यात्रेदरम्यान खराब हवामान आणि तांत्रिक कारणांमुळे दोन हेलिकॉप्टर्सचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. रुद्रप्रयाग येथे खराब हवामानामुळे एका हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते. तर टिहरी येथे तांत्रिक बिघाडामुळे दुसऱ्या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करावे लागले होते. त्यातच आता बद्रीनाथ परिसरात हेलिकॉप्टर बेपत्ता झाल्याने हवाई सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.