एलपीजी सिलेंडरच्या किमतीत मोठी वाढ

0

नवी दिल्ली । सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक क्षेत्राला महागाईचा झटका बसला आहे. सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC), हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) आणि भारत पेट्रोलियम (BPCL) यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात वाढ केली आहे. नव्या दरानुसार, देशातील प्रमुख शहरांमध्ये व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत साधारण १० रुपयांनी वाढ झाली आहे.

महत्त्वाचे म्हणजे, १४.२ किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबे, केटरिंग आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना वाढीव दराचा फटका बसणार आहे.

नवीन दर लागू झाल्यानंतर दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत २७३८ रुपयांवरून २७४७.५० रुपये झाली आहे. म्हणजेच प्रति सिलेंडर ९.५० रुपयांची वाढ झाली आहे. मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर२६९१ रुपयांवरून सुमारे २७०१ रुपयांपर्यंत वाढला आहे. या दरवाढीमुळे व्यावसायिक एलपीजी वापरणाऱ्या व्यवसायांच्या मासिक खर्चात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे, याच्या अगदी उलट चित्र ऑगस्टमध्ये पाहायला मिळाले होते. १ ऑगस्ट २०२६ रोजी १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सुमारे १९२ रुपयांची मोठी कपात करण्यात आली होती. तत्पूर्वी १ जुलै २०२६ रोजीही व्यावसायिक सिलेंडरच्या दरात १८३.५० रुपयांची कपात करण्यात आली होती. त्यामुळे सलग दोन महिन्यांच्या कपातीनंतर सप्टेंबरमध्ये पुन्हा दर वाढल्याने व्यावसायिक ग्राहकांच्या खर्चात वाढ झाली आहे.

दरम्यान, घरगुती वापरासाठी असलेल्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलेंडरचे दर सप्टेंबरमध्येही स्थिर ठेवण्यात आले आहेत. घरगुती सिलेंडरच्या दरात शेवटचा बदल ७ जून २०२६ रोजी झाला होता. सध्या विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ९४२ रुपये आहे. कोलकात्यात ९६८ रुपये, मुंबईत ९४१.५० रुपये, तर चेन्नईमध्ये ९५७.५० रुपये दराने घरगुती सिलेंडर उपलब्ध आहे.

म्हणजेच, सप्टेंबरच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी वापरणाऱ्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडला असला, तरी घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.