केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याच्या चर्चांना वेग

0

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होण्याच्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आला आहे. मंत्रिमंडळातील संभाव्य बदलाबाबत लवकरच घोषणा होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाच्या नेते मंडळींसोबत बैठक होण्याची शक्यता आहे. मात्र, सत्ताधारी एनडीए किंवा भारतीय जनता पक्षाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काही खासदारांची चहापानाच्या निमित्ताने भेट घेणार असल्याच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. गुरुवारी पंतप्रधान मोदी काही खासदारांसोबत चहावर चर्चा करू शकतात, अशी माहिती समोर आली होती. मात्र, या बैठकीसाठी नेमक्या कोणत्या खासदारांना निमंत्रण देण्यात आले आणि बैठकीचा अजेंडा काय आहे, याबाबत भाजपकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. त्यामुळे सध्या या भेटीबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वीही पंतप्रधान मोदी यांनी एनडीएच्या खासदारांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान, पंतप्रधान मोदी शनिवारपासून ४ दिवसांच्या परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात ते उझबेकिस्तानला भेट देतील. त्यानंतर किर्गिस्तानची राजधानी बिश्केक येथे होणाऱ्या SCO शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.

दरम्यान, १७ ऑगस्ट रोजी भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. ६५ पदाधिकाऱ्यांच्या या नव्या टीममध्ये ५१ नवीन चेहरे आहेत. यामध्ये १२ महिलांसह ६ नेत्यांचा समावेश आहे. पक्षाच्या मते, आगामी विधानसभा निवडणुका आणि २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक तयारी मजबूत करण्याच्या उद्देशाने हे बदल करण्यात आले आहेत.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भाजपच्या राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नव्या टीममध्ये समाविष्ट करण्यात आलेले ते एकमेव केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळेही मंत्रिमंडळातील संभाव्य फेरबदलाबाबतच्या चर्चांना बळ मिळाले आहे. दरम्यान, स्मृती इराणी आणि राम माधव यांसारख्या नेत्यांना पक्षाच्या संघटनेत पुन्हा महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने आगामी काळात केंद्रातील राजकीय समीकरणांमध्येही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता केंद्रीय मंत्रिमंडळात नेमके कोणते बदल होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.