स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड; आणखी ५ ग्राहकांवर गुन्हे

0

धुळे : स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करणाऱ्या पाच ग्राहकांवर शिरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी अशाच प्रकरणांत चार ग्राहकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. महावितरणच्या धडक कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.​

शोभाबाई मधुकर माळी (रा.मेथी ता.शिंदखेडा) या ग्राहकाच्या स्मार्ट मीटरमध्ये अनधिकृत स्वरूपाची भौतिक छेडछाड करून वीज वापराची नोंद कमी केल्याचे तपासणीत निदर्शनास आले. सहायक अभियंता प्रेमसागर चुनारकर यांच्या फिर्यादीवरून या ग्राहकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शाहरुख शकील पिंजारी, एजाज कमरुद्दीन खाटीक, समीना सईद पिंजारी व फिरोजाबी निसार पिंजारी (सर्व रा.गौसियानगर, दोंडाईचा ता.शिंदखेडा) या ग्राहकांनीही मीटरमध्ये छेडछाड केल्याचे आढळले. सहायक अभियंता सचिन पावरा यांच्या फिर्यादीवरून ​चारही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या सर्व प्रकरणात वीजमीटरला छेडछाड करून चोरीस साह्य करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मार्ट मीटरमध्ये छेडछाडीची पद्धत समान स्वरूपाची असल्याने, या प्रकारामागे एखादी व्यक्ती, टीम अथवा वीजचोरीसाठी कार्यरत रॅकेट आहे का, याचाही तपास करण्यात येत आहे. ग्राहकांना मीटरमध्ये छेडछाड करण्यासाठी मदत करणाऱ्या, छेडछाड करणाऱ्या किंवा अशा गैरप्रकारात सह​भागी असलेल्या व्यक्तींविरुद्धही कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ​सर्व प्रकरणांमध्ये भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५, १३८ व १५० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.