कर्जतमधील वृक्षतोडीवरून संजय राऊत संतापले; उज्ज्वल निकमांसह भाजपवरही निशाणा

0

ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी कर्जत येथे होत असलेल्या वृक्षतोडीचं समर्थन केलं आहे. त्यावरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. आम्हाला उज्जवल निकम यांच्याबद्दल आदर आहे. ते आमचे मित्र आहेत. पण त्यांनी एका खासदारकीसाठी अब्रूची लक्तरे काढली आहेत. 10 झाड म्हणजे एक कसाब आहे. आम्ही झाडं आणि कसाब यांना एकात तागडीत तोलतो, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला आहे. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी हा हल्ला चढवला.

उज्ज्वल निकम या सरकारच्या बाजूने उभे आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राला किती पर्यावरण पूरक आहे, हे सांगण्यासाठी निकम उभं राहिले आहेत हे दुर्देव आहे. निकम भाजपमध्ये एका खासदारकीसाठी अब्रुची लक्तरे काढून घेत आहेत, हे दुर्देव आहे. ते आमचे मित्र आहेत. पण ते राक्षसी पक्षात गेले आहेत. कसाबच्या प्रकारणात ते मानवतावाद सांगत होते. 10 झाडं तोडणं म्हणजे एक कसाब आहे. कसाब आणि झाडांची हत्या आम्ही एकाच तागडीत तोडतो, असं संजय राऊत म्हणाले.

हे सरकार चंद्रपूरमध्ये अदानीला खाणी देत आहे. छत्तीसगडमध्ये जंगलं नष्ट केली जात आहे. उज्ज्वल निकम यांच्यासारख्या ज्येष्ठ वकिलांनी राक्षसांची बाजू घेऊन लढू नये. पर्यावरण नष्ट करणाऱ्यांच्या बाजूने उभं राहणं म्हणजे कसाबची बाजू घेणं. बॉम्बस्फोटातील आरोपींची बाजू घेणं आहे. तुम्हाला नम्रपणे सांगतो. तोंड उघडायला जाऊ नका. तुम्हीच तुमची बेअब्रू करून घेत आहात. भाजप अशा चांगल्या लोकांचा वापर करून घेत आहे, अशी टीका राऊत यांनी केली.

अदानी का जन्माला आले?
विदर्भ जंगल आणि व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखला जातो. तुम्ही अदानीसाठी व्याघ्र प्रकल्पावर कुऱ्हाड चालवत आहात. विदर्भातील सुपुत्र असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी याला विरोध केला पाहिजे. सुधीर मुनगंटीवार यांनी आंदोलन करावं, आम्ही सोबत येतो. 5 हजार झाडं तोडत असतील तर असे अदानी नकोच. अदानी का जन्माला आले? आमच्याच देशात का जन्माला आले? महाराष्ट्रावर हा भार का? असे अदानी नकोत. आम्हाला टाटा, बिर्ला, किर्लोस्कर हवेत. आम्हाला उद्योगपती हवेत, पण ते महाराष्ट्र उभा करणारे हवेत. उद्योगपतींनी महाराष्ट्राचं वैभव वाढवलं आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

या आदिवासींना बळ द्या
आरेचं आंदोलन संपलं नाही. कर्जतचं आंदोलन सुरू झालंय. विदर्भातील आंदोलनाची ठिणगी टाकली जाईल. या सरकारच्या बापालाही झाडं तोडता येणार नाही. आदित्य ठाकरे या आंदोलनाचं नेतृत्व करत आहेत. आम्ही इतरांनाही आवाहन करतोय, तुम्ही या आणि आदिवीसांना बळ द्या, असं आवाहन त्यांनी केलं.

Leave A Reply

Your email address will not be published.