नशिराबादमध्ये पोलिसांची मोठी कारवाई; गांजासह २.६५ लाखांचा मुद्देमाल जप्त
नशिराबाद : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात नशिराबाद पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले आहे. साती बाजार चौकात गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. संशयितांकडून गांजा, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण २ लाख ६५ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

जिल्ह्यात अमली पदार्थांच्या गैरव्यवहाराला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जात आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेदरम्यान नशिराबाद पोलिसांना गांजाच्या विक्रीबाबत गोपनीय माहिती मिळाली.


साती बाजार चौक परिसरात काही व्यक्ती गांजा विक्रीच्या उद्देशाने थांबल्या असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने हालचाली सुरू केल्या. पथकाने परिसरात दबा धरून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. संशयास्पद व्यक्ती आढळताच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत झडती घेतली. या झडतीमध्ये गांजा आढळून आला. या कारवाईत राजेश भारत बाडगे (३२, रा. महादेव मंदिराजवळ, तांबापुरा, जळगाव) आणि सुभाष सीमा मराठे (६८, रा. सातोदीनगर, नशिराबाद) यांना ताब्यात घेण्यात आले.
गांजा, दुचाकी आणि मोबाईल जप्त
पोलिसांनी केलेल्या पंचनाम्यात ३ किलो ४५८ ग्रॅम गांजा, २४० ग्रॅम गांजा, होंडा शाईन मोटारसायकल (एमएच-१९-सीडी-९५७४), ओप्पो कंपनीचा मोबाईल आणि भारत कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला.जप्त केलेल्या सर्व वस्तूंची किंमत २ लाख ६५ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
या प्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.दरम्यान, जळगाव जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक आणि सेवन करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असून, अशा प्रकारांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.