दिवाळीच्या तोंडावर साखरेचे दर कडाडले! किलोमागे ५ रुपयांची वाढ; ग्राहकांचे बजेट बिघडणार?
दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू असतानाच साखरेच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांना महागाईचा आणखी एक फटका बसण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात लाडू, करंज्या, चकल्या आणि विविध मिठाई तयार करण्यासाठी साखरेची मागणी वाढते. अशातच गेल्या दहा दिवसांत साखरेच्या किरकोळ दरात प्रतिकिलो ५ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिवाळीचा फराळ तयार करण्यासाठी यंदा अधिक खर्च करावा लागू शकतो.

पुणे शुगर मर्चंट्स असोसिएशनच्या माहितीनुसार, घाऊक बाजारातील साखरेचा दर प्रतिकिलो ५२ रुपयांवरून ५४ रुपयांपर्यंत वाढला आहे. तर किरकोळ बाजारात हाच दर ५४ रुपयांवरून ५९ रुपयांपर्यंत पोहोचला आहे.


या दरवाढीमुळे पाच किलो साखर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत २५ रुपये अधिक खर्च करावे लागत आहेत. दिवाळीच्या काळात मिठाई आणि गोड पदार्थांची मागणी आणखी वाढण्याची शक्यता असल्याने किरकोळ बाजारात साखरेचा दर प्रतिकिलो ६० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
उत्पादन खर्च वाढल्याचा बाजारावर परिणाम
साखरेच्या दरात वाढ होण्यामागे सणासुदीतील वाढती मागणी हे एक कारण असले, तरी उत्पादन खर्च आणि साखरेच्या उत्पादनाचे प्रमाण यांचाही बाजारावर परिणाम होत आहे. साखर कारखान्यांकडून सध्या सुमारे ५० रुपये प्रतिकिलो दराने साखर विकली जात असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या वर्षी दिवाळीच्या काळात साखरेचा हा दर सुमारे ३९ रुपये प्रतिकिलो होता. त्या तुलनेत यंदा दर अधिक असल्याने मिठाई उत्पादकांसह घरगुती ग्राहकांनाही वाढीव खर्चाचा सामना करावा लागू शकतो.उसापासून साखर तयार होण्याचे प्रमाण कमी राहिल्यास बाजारातील पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. त्यातच सणासुदीच्या काळात मागणी वाढल्यास दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.