जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले
जळगाव : जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मोठी संस्था असलेल्या दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (जेडीसीसी) संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केले. बँकेच्या एकूण २१ जागांसाठी २९ नोव्हेंबरला मतदान होणार असून, ३० नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाणार आहे.

निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. विविध राजकीय गटांकडून उमेदवारांची जुळवाजुळव, मतदारांचे गणित आणि संभाव्य आघाड्यांबाबत चर्चा सुरू झाली आहे. काही दिग्गज नेत्यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असल्याने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पर्याय म्हणून पुढे केले जात असल्याचे चित्र आहे.


या निवडणुकीत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या सहभागामुळे राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन, आमदार संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, माजी मंत्री अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील, माजी आमदार चिमणराव पाटील यांच्या पत्नी नलिनी पाटील आणि जिल्हा बँकेचे विद्यमान उपाध्यक्ष तथा आमदार अमोल पाटील यांच्या पत्नी मृणाल पाटील यांचे ठराव दाखल झाल्याचे सांगण्यात येत आहे.
जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष तथा आमदार मंगेश चव्हाण आणि मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांचेही ठराव पहिल्यांदाच दाखल झाल्याने निवडणुकीतील राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल होणे, छाननी आणि माघारीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
२६ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज
निवडणुकीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे :
उमेदवारी अर्ज दाखल करणे : २६ ते ३० ऑक्टोबर, सकाळी ११ ते दुपारी ३
अर्जांची छाननी : २ नोव्हेंबर, सकाळी ११ वाजता
वैध उमेदवारांची यादी : ३ नोव्हेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत : ३ ते १७ नोव्हेंबर, दुपारी ३ वाजेपर्यंत
चिन्हवाटप व अंतिम उमेदवार यादी : १८ नोव्हेंबर, सकाळी ११ वाजता
मतदान : २९ नोव्हेंबर, सकाळी ८ ते सायंकाळी ४
मतमोजणी व निकाल : ३० नोव्हेंबर, सकाळी ९ वाजल्यापासून