यावलमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! तीन अपत्य प्रकरणी नगरसेवक अपात्र
यावल नगरपरिषदेचे काँग्रेसचे नगरसेवक शेख निसार हमीद यांना तीन अपत्य प्रकरणी नगरसेवक पदावरून अपात्र घोषित केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर पालिका प्रशासनाचे सहआयुक्त जनार्दन पवार यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला. या निकालामुळे यावल नगरपरिषदेतील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक ५-अ चे काँग्रेस नगरसेवक शेख निसार हमीद यांच्याविरुद्ध उमेश रेवा फेगडे यांनी तीन अपत्य प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. शेख निसार यांना एकूण ४ अपत्ये असून त्यांच्या चौथ्या अपत्याचा जन्म ६ जून २००३ रोजी झाल्याचा पुरावा फेगडे यांनी मांडला होता. मात्र, शेख निसार यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात १२ सप्टेंबर २००१ नंतर एकही अपत्य जन्मास आले नसल्याचे म्हटले होते. या प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात ४ व १८ ऑगस्ट आणि १८ सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. यात शेख निसार यांच्या चौथ्या अपत्याचा जन्म २००३ मधील असल्याचे सिद्ध झाले. त्यानुसार त्यांना नगरसेवक पदावरून अपात्र घोषित केले. दरम्यान, या निकालावर आपण समाधानी नसून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या आदेशाविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे शेख निसार यांनी स्पष्ट केले आहे.

सत्ता समीकरणांवर थेट परिणामाची शक्यता शहरात सत्ताधारी महाविकास आघाडीकडे तंतोतंत बहुमत होते, तर काही प्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्षांचे अतिरिक्त मत वापरण्याची संधी होती. आता सत्ताधारी गटातील सदस्यसंख्या एकाने घटल्याने सत्ता समीकरणात बदल झाला आहे. येत्या २६ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या नगरपालिका सभेत याचे थेट पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

