जळगावात व्यापाऱ्याच्या फसवणुकीतून तरुण उद्योजकाची आत्महत्या
जळगाव : राजस्थानातील एका फर्मला पाठवलेल्या मालाचे सुमारे ७ लाख रुपये थकीत राहिल्याने आर्थिक आणि मानसिक तणावातून जळगावातील एका तरुण उद्योजकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एमआयडीसी परिसरातील म्हाळसाई इरिगेशन कंपनीत योगेश एकनाथ नेमाडे (३५, रा. ईश्वर कॉलनी, जळगाव) यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. सोमवारी (१० ऑगस्ट) ही घटना घडली.

योगेश नेमाडे हे व्यवसायानिमित्त राजस्थानमधील एका फर्मला माल पुरवत होते. संबंधित फर्मकडून मालाचे पैसे मिळणे अपेक्षित होते. मात्र, सुमारे ७ लाख रुपयांची थकबाकी दीर्घकाळ मिळाली नसल्याने ते आर्थिक अडचणीत आले होते. याच कारणातून ते मानसिक तणावात असल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.


सुसाईड नोटमुळे प्रकरणाला वेगळे वळण
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता मृतदेहाजवळ सुसाईड नोट आढळून आली. या चिठ्ठीत योगेश यांनी आपल्या मृत्यूमागील कारणाबाबत माहिती दिल्याचे समोर आले आहे.
राजस्थानमधील धार जिल्ह्यातील राजोद येथील एका फर्मकडून आपली मोठी रक्कम येणे बाकी असल्याचा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये केल्याचे सांगण्यात येत आहे. पैसे मिळविण्यासाठी संबंधितांकडे वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने आपण त्रस्त झाल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.
याशिवाय संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करताना कॉल लिस्ट तपासण्याचा उल्लेखही त्यांनी केल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रकरणात आर्थिक व्यवहार नेमका कसा झाला आणि थकीत रक्कम कोणाकडे होती, याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
कुटुंबीयांसाठी भावनिक संदेश
सुसाईड नोटमध्ये योगेश यांनी पत्नी आणि मुलीचा उल्लेख करत कुटुंबीयांची माफी मागितल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे.
योगेश हे भावासोबत व्यवसाय करत होते. एमआयडीसी परिसरात त्यांचा व्यवसाय सुरू होता. सोमवारी कंपनीच्या आवारात त्यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
एमआयडीसी पोलिसांकडून तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी सुसाईड नोट ताब्यात घेतली असून त्यातील मजकूर आणि संबंधित आर्थिक व्यवहाराची पडताळणी सुरू केली आहे.
राजस्थानमधील संबंधित फर्मसोबत झालेला व्यवहार, थकीत रक्कम आणि सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या व्यक्तींची भूमिका याबाबत तपास केल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. या घटनेमुळे जळगावातील व्यापारी आणि उद्योजक वर्तुळात खळबळ उडाली आहे.