अर्णब’ चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकलं! महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा; १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

0

बंगालच्या उपसागरातील ‘अर्णब’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज असून, तेथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच विदर्भातील काही जिल्ह्यांसह मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.

पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात आज जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे. गडचिरोलीसह पूर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतही जोरदार वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. याशिवाय यवतमाळ, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.

विदर्भाबरोबरच मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत, तसेच मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित भागांतही तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.