“शिक्षण असेल तर समाज सुखी होईल”; नानजीभाई ठक्कर यांचे प्रतिपादन

0

दिवा । शिक्षण हे समाजाच्या प्रगतीचे आणि सुखसमृद्धीचे प्रमुख साधन असून, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना उत्तम शिक्षण देऊन उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन समाजसेवक नानजीभाई खीमजीभाई ठक्कर यांनी केले. दिवा येथील गुजराती विकास मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी त्यांनी शिक्षणाचे महत्त्व, मुलांवरील संस्कार आणि घरातील सकारात्मक वातावरण याविषयी मार्गदर्शन केले.

शिक्षणातूनच समाजाची प्रगती

या कार्यक्रमाला समाजसेवक नानजीभाई खीमजीभाई ठक्कर (ठाणावाला), रणछोडभाई राठोड, पूज्य जन्मेजय शरणजी महाराज (अयोध्या), रविकुमार धारिया, हरीशभाई धारिया, विनोदभाई मकवाणा, प्रकाशभाई राठोड, केशवभाई गोहिल, सुशीला माताजी, भानुबाई, निलेश पाटील, स्नेहा पाटील, किरणबेन अशोकभाई सोलंकी, विनुबेन पडाया, राजेंद्र पांडे यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मनोगतात नानजीभाई ठक्कर यांनी, “शिक्षण असेल तर समाज सुखी होईल,” असे सांगत शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. प्रत्येक पालकाने मुलांना उत्तम शिक्षण देण्यासोबतच त्यांना उच्च शिक्षण घेऊन जीवनात प्रगती करण्यासाठी प्रोत्साहित करावे. मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांचे भविष्य उज्ज्वल करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

घराला मंदिरासमान पवित्र ठेवा!

घरामध्ये प्रेम, शांतता, एकता आणि सद्भावनेचे वातावरण जपले पाहिजे. आपले घर मंदिराप्रमाणे पवित्र, स्वच्छ आणि संस्कारमय असावे, असे आवाहनही त्यांनी केले.

देवाच्या प्राप्तीसाठी केवळ मंदिरात जाणे आवश्यक नाही. मन शुद्ध असेल आणि कर्म चांगली असतील, तर परमेश्वराचा वास आपल्या घरातही असतो, असा आध्यात्मिक संदेश त्यांनी उपस्थितांना दिला. शिक्षणाला प्राधान्य देतानाच मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले.

साड्या, पेन, गीतासार आणि वह्यांचे वाटप

कार्यक्रमादरम्यान श्रीमती धनलक्ष्मीबेन नानजीभाई ठक्कर यांच्या वतीने साड्या, पेन, गीतासार आणि वह्यांचे वाटप करण्यात आले. या सामाजिक आणि सेवाभावी कार्याची दखल घेत गुजराती विकास मंडळातर्फे नानजीभाई खीमजीभाई ठक्कर यांना सन्मानचिन्ह प्रदान करून गौरविण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.