२१ आणि २२ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट
मुंबई/जळगाव: राज्यात सध्या हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. एकीकडे विदर्भात सूर्याने आग ओकायला सुरुवात केली असून पारा ४४-४५ अंशांच्या पार गेला आहे, तर दुसरीकडे अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्याच्या बहुतांश भागात पूर्वमोसमी (अवकाळी) पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. आगामी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचं सावट राहणार असून भारतीय हवामान विभागाने आज मंगळवार राज्यातील २४ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
जळगाव जिल्ह्यासाठी विशेष इशारा
जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने २१ आणि २२ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. या काळात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे तापमानात २-३ अंशांची घट झाली असली तरी, आर्द्रता वाढल्याने उकाडा कायम राहणार आहे.


येथे आहे पावसाची शक्यता (यलो अलर्ट):
कोकण: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग.
पश्चिम महाराष्ट्र: पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर.
उत्तर महाराष्ट्र: नाशिक, धुळे, जळगाव आणि अहिल्यानगर.
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर आणि नांदेड.
विदर्भ: नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि चंद्रपूर.
विदर्भात उष्णतेची लाट कायम
एककीकडे पावसाचा इशारा असला तरी, विदर्भातील अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मात्र उष्णतेची लाट (Heatwave) कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यात एकाच वेळी पावसाळी वातावरण आणि तीव्र उन्हाचा चटका असा दुहेरी अनुभव नागरिकांना येत आहे.