पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे; आज या जिल्ह्यांना ऑरेंज, येलो अलर्ट

0

मुंबई | राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होत असून धरणांमधील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे. विशेषतः कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम असून, पुढील २४ तास राज्यासाठी महत्त्वाचे असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज असून बहुतांश भागात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे.

जळगाव जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा मुक्काम

दरम्यान जळगाव जिल्ह्यात देखील मागच्या तीन चार दिवसात पावसाने चांगली हजेरी लावली. हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यादरम्यान हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज असून खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

यंदा मान्सूनचे आगमन उशिरा झाले असले तरी गेल्या १५ ते २० दिवसांतील जोरदार पावसाने पावसाची तूट मोठ्या प्रमाणात भरून काढली आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक मोठ्या धरणांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची चिंताही काही प्रमाणात कमी झाली आहे.

दरम्यान, सततच्या पावसामुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून डोंगराळ भागात दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी नदीपात्र, पूल आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे तसेच स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.