पारोळ्यात कोंबड्यांच्या खाद्याच्या गोण्यांमध्ये लपवून रेशनच्या धान्याची तस्करी उघड
पारोळा । शासकीय रेशनिंगचा गहू आणि तांदूळ कोंबड्यांच्या खाद्याचा छाप असलेल्या गोण्यांमध्ये लपवून काळ्या बाजारात तस्करी करण्याचा एक धक्कादायक प्रकार पारोळा शहरात उघडकीस आला आहे. पारोळा पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ७३.५४ क्विंटल धान्य आणि मालवाहू ट्रक असा एकूण ७ लाख १२ हजार ९७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी धान्यमालक सुभाष विठ्ठल वाणी (वय ६१, रा. पारोळा) आणि एक फरार अज्ञात ट्रक चालक यांच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


घटना नेमकी कशी घडली?
पारोळा शहरातील ‘सप्तर्षी मंगल कार्यालया’च्या समोर आणि भाग्यश्री टोल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत काही संशयित हालचाली सुरू असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.
सप्तर्षी मंगल कार्यालयासमोर उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या केशरी मालवाहू ट्रकमध्ये (क्र. एमएच १६ एई ६८६६) तपासणी केली असता, प्रशासनाची दिशाभूल करण्यासाठी संशयितांनी कोणत्याही वैध परवान्याशिवाय कोंबड्यांच्या खाद्याच्या गोण्यांमध्ये रेशनचा गहू आणि तांदूळ भरल्याचे निदर्शनास आले.