ठाण्यात वागड रघुवंशी मित्र मंडळाचा नूतन वर्ष स्नेहमिलन सोहळा उत्साहात

0

ठाणे । श्री वागड रघुवंशी मित्र मंडळातर्फे नूतन वर्षाच्या प्रारंभानिमित्त ठाणे येथील शेठ एन. के. टी. सभागृह व प्रांगणात १० नोव्हेंबर २०२६ रोजी ज्ञाती बांधवांच्या स्नेहमिलनाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला श्री कच्छ वागड समाजातील ८०० हून अधिक ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचा शुभारंभ श्री कच्छ वागड लोहाणा महाजनचे अध्यक्ष नानजीभाई खीमजीभाई ठक्कर (ठाणेवाला), मानद मंत्री नटवरलाल वीरजीभाई ठक्कर, उपाध्यक्ष दिनेशभाई दीपचंदभाई कोटक तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

स्नेहमिलनाच्या निमित्ताने लहान मुलांनी नृत्य, गायन तसेच विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विविध स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

यावेळी अध्यक्ष नानजीभाई ठक्कर यांनी मुलांना उच्च शिक्षण घेण्याचे आवाहन केले. समाजातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांनी डॉक्टर, सी.ए. आणि इंजिनिअर होऊन कुटुंबासह समाजाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षणाला प्राधान्य देत आपल्या भविष्यासाठी मेहनत करावी, असे त्यांनी सांगितले.

आई-वडील हे देवापेक्षाही श्रेष्ठ असून त्यांचा नेहमी आदर व सन्मान करावा, असा संदेशही त्यांनी दिला. तसेच घरातील स्त्री ही लक्ष्मीस्वरूप असून ती संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते. कुटुंबाच्या प्रगतीत महिलांची महत्त्वाची भूमिका असल्याने त्यांचा नेहमी आदर व सन्मान करावा. महिलांना आनंदी ठेवल्यास संपूर्ण कुटुंब आनंदी आणि सुखी राहते, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे आयोजन समाजातील युवा कार्यकर्ते परेश नानजीभाई ठक्कर, मुकेशभाई रैया, प्रवीण सचदे, शंकर ठक्कर, रमेश पुजारा, मुकेश कोटक तसेच अन्य युवा सदस्यांनी केले होते. युवा कार्यकर्त्यांकडून दरवर्षी अशा स्नेहमिलनाचे आयोजन केले जाते.

स्नेहमिलनाच्या निमित्ताने समाजबांधवांनी एकमेकांना नूतन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. आनंद, उत्साह आणि आपुलकीच्या वातावरणात विविध कार्यक्रमांचा आनंद घेतल्यानंतर शेवटी सर्वांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अशा उत्साही वातावरणात नूतन वर्ष स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला.

Leave A Reply

Your email address will not be published.