इगतपुरीतील साई निवारा येथे स्लॅब कोसळुन शिर्डीला जाणाऱ्या चार महिलंसह १७ साईभक्त जखमी

0

 सुदैवाने पालखीवर स्लॅब कोसळल्याने मोठा अनर्थ टळला.

इगतपुरी । इगतपुरी येथे शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांच्या मुक्कामाच्या ठिकाणी साई भक्तांवर स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. मुंबई नाशिक महामार्गावरील साई निवारा परिसरात मुक्कामी असलेल्या साई भक्तांवर स्लॅबचा काही भाग अचानक कोसळल्याने वाशिंद (ता. शहापूर) येथील तब्बल १७ साईभक्त जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व साईभक्त शिर्डीला दर्शनासाठी जात असताना मुक्कामाच्या ठिकाणी जेवण आटोपून विश्रांती घेत होते. त्याचवेळी अचानक स्लॅबचे गर्डर आणि फरशा कोसळल्याने एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक १७ रोजी ठाणे जिल्ह्यातील वाशिंद, शहापूर परिसरातील साईभक्तांचा समूह शिर्डीच्या दर्शनासाठी जात होता. प्रवासादरम्यान इगतपुरी येथील साई निवारा येथे त्यांनी जेवण केले. जेवण आटोपल्यानंतर काही साईभक्त आराम करत असतानाच रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक इमारतीच्या स्लॅबचे गर्डर आणि फरशा कोसळल्या. या दुर्घटनेत सुरुवातीला सात ते आठ भाविक जखमी झाल्याची माहिती समोर आली होती. मात्र, उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या जखमींची संख्या वाढून १७ वर पोहोचली.

या अपघातात दोन साईभक्तांच्या डोक्याला गंभीर स्वरूपाच्या जखमा झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तसेच तीन जणांना फ्रॅक्चर झाल्याने त्यांनाही पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. जखमींमध्ये चार महिलांचाही समावेश असून उर्वरित दहा जखमींवर इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्षा शालिनी खातळे, उपनगराध्यक्ष मंगेश शिरोळे, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, इगतपुरी पोलीस आणि टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींना ढिगाऱ्यातून बाहेर काढून तातडीने इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी पोलिसांसह सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला.

पालखीवर स्लॅब कोसळल्याने मोठा अनर्थ टळला!

या दुर्घटनेत स्लॅबचा कोसळलेला भाग पालखीवर पडल्याने खाली विश्रांती घेत असलेल्या साईभक्तांवर थेट स्लॅब कोसळण्याचा मोठा धोका टळला. त्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळल्याची चर्चा घटनास्थळी होती. शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या प्रवासात अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे वाशिंद परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सुदैवाने सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.

@ चौकट :
या दुर्घटनेमुळे साई निवारा येथील बांधकामाच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता व्हॅलीत ( दरीत ) बांधकाम केले असल्याचे समोर आले आहे. महामार्गावरील कसारा घाटात पावसाचे पाणी जाण्यासाठी असलेल्या ( दरीत ) व्हॅलीत बांधकाम करण्यास परवानगी मिळत नाही. परंतु या व्हॅली परिसरात अनधिकृतपणे पाच ते सात मजल्यांच्या इमारतींचे बांधकाम सुरू आहे.

@ चौकट : इगतपुरी परिसरात व नगरपरिषद हद्दीत शेकडो बंगले व रिसॉर्ट मालकांनी कुठलीही अधिकृत परवानगी न घेता पावसाचे पाणी वाहून जाणाऱ्या दरीत बांधकाम केले आहे. हे रिसॉर्ट व्हीला व बंगले इगतपुरीत येणाऱ्या पर्यटकांना मोठी रक्कम घेऊन चोवीस तासांसाठी भाड्याने दिले जातात. यामुळे भविष्यात मोठ्या दुर्घटना होण्याच्या शक्यता असून अनधिकृतपणे बांधकाम केलेले बंगले व व्हीला यावर इगतपुरी नगरपरिषदेकडून काय कारवाई केली जाणार आहे हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.