बोरनार येथे लग्नसोहळ्यात २३ वर्षीय तरुणाचा खून

0

जळगाव |: जळगाव तालुक्यातील बोरनार येथे लग्नसोहळ्यादरम्यान झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी घडली. प्रेम गोपाल धनगर (वय २३, मूळ रा. बोरनार, सध्या रा. अमळनेर) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे बोरनारसह पंचक्रोशीत मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रेम धनगर हा अमळनेर येथे वास्तव्यास होता, तर त्याचे आई-वडील बोरनार येथे राहतात. दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या गावी आला होता. बुधवारी सायंकाळी गावातील एका लग्नसोहळ्याला उपस्थित असताना त्याचा काही जणांसोबत वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी अज्ञात हल्लेखोराने प्रेम याच्यावर धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाच्या दृष्टीने आवश्यक माहिती घेतली. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला असून, हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान, मृत प्रेम धनगर याच्यावर यापूर्वी काही गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, लग्नसोहळ्यात नेमका कोणत्या कारणावरून वाद झाला आणि या हत्येमागे कोणाचा सहभाग आहे, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. घटनेबाबत स्थानिकांकडून माहिती मिळविण्याचे पोलिसांसमोर आव्हान असून, एमआयडीसी पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून संशयितांचा शोध घेत पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.