अलर्ट’ मान्सून लवकर येणार, पण प्रवास रेंगाळणार; यंदा ‘२००२’ सारख्या भीषण परिस्थितीचा धोका?

0

जळगाव/मुंबई । देशासह राज्यात उष्णतेच्या लाटेत नागरिक होरपळून निघत असून अशातच सगळ्यांच्या नजरा आता मान्सून पावसाकडे लागले आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्याने यंदा केरळमध्ये मान्सूनचे आगमन नेहमीपेक्षा लवकर होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असला, तरी मान्सूनच्या पुढील प्रवासाबाबत चिंता वाढवणारी माहिती समोर आली आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असल्याने मान्सूनच्या गतीवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

अंदमानमध्ये १८ मेपर्यंत मान्सून पोहोचेल, असा प्राथमिक अंदाज होता; मात्र कमी दाबाच्या क्षेत्रामुळे त्याच्या आगमनाला विलंब झाला. आता नव्या अंदाजानुसार, केरळमध्ये मान्सून २६ मे २०२६ पर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये मान्सून २४ मे रोजी केरळमध्ये पोहोचला होता.

महाराष्ट्रात मान्सून कधी धडकणार?

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, केरळमध्ये आगमन झाल्यानंतर पुढील २ ते ४ दिवसांत मान्सून तळकोकणात प्रवेश करू शकतो. त्यानंतर आणखी दोन दिवसांत तो मुंबईत दाखल होण्याची शक्यता असून, १० जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात १५ ते २१ जूनदरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जूनच्या उत्तरार्धात मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो; मात्र जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. जुलै महिन्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडू शकतात, त्यामुळे काही प्रमाणात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कमकुवत सुरुवातीचे संकेत

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून ते सप्टेंबर या नैऋत्य मान्सून हंगामात सरासरीच्या ९२ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जून महिन्यातही सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे दुष्काळ आणि अतिवृष्टी या दोन्ही परिस्थितींसाठी प्रशासन आणि शेतकऱ्यांनी सज्ज राहण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.

‘२००२’सारखी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

मान्सून केरळमध्ये लवकर दाखल होत असला, तरी संपूर्ण देश व्यापण्यासाठी यंदा अधिक वेळ लागू शकतो. सामान्यतः मान्सूनला संपूर्ण भारत व्यापण्यासाठी ३५ ते ३८ दिवस लागतात. मात्र, ‘स्कायमेट’चे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या मान्सूनसमोर २००२ प्रमाणे अडथळ्यांची शक्यता आहे. २००२ मध्ये मान्सून २९ मे रोजी केरळमध्ये दाखल झाला होता; मात्र संपूर्ण देश व्यापण्यासाठी तब्बल ७९ दिवस लागले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.