बोदवड खूनप्रकरणी दोन पोलिस मुख्यालयात जमा

0

बोदवड । चोरीची फिर्याद दिल्याच्या रागातून बोदवड येथील हिदायत नगरमधील अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सुरी) (वय ३२) या तरुणाचा बुधवार, दि. २० मे रोजी भरदिवसा खून करण्यात आला. या खळबळजनक घटनेनंतर बोदवड पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना तातडीने पोलीस मुख्यालयी जमा करण्यात आले आहे. मोहन चौधरी आणि रवींद्र गुरचळ अशी या कर्मचाऱ्यांची नावे असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.

हिदायत नगर परिसरातील अन्सार पिंजारी यांच्याकडे काही दिवसांपूर्वी चोरीची घटना घडली होती. याप्रकरणी त्यांनी बोदवड पोलिसांत तक्रार दाखल करत अरबाज शहा लतीश शहा (वय २५) याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्यानुसार पोलिसांनी अरबाज याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते; मात्र नंतर त्याला सोडून देण्यात आले.

दरम्यान, चौकशीनंतर अरबाज याने सोशल मीडियावर “आज तेरा गेम होगा” असे स्टेटस ठेवत अन्सार याला धमकी दिल्याचा आरोप आहे. या धमकीबाबत अन्सार यांनी पुन्हा पोलिसांत तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी या गंभीर इशाऱ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

यानंतर बुधवारी दुपारी अन्सार पिंजारी यांचा निर्घृण खून करण्यात आला. घटनेनंतर आरोपी अरबाज शहा याला रात्री Bhusawal येथून अटक करण्यात आली. गुरुवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या घटनेनंतर संतप्त नागरिक आणि नातेवाईकांनी पोलिसांच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली होती. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत दोन पोलिस कर्मचाऱ्यांना मुख्यालयात जमा केले.

दरम्यान, या खूनप्रकरणाचा पुढील तपास अमितकुमार बागुल यांच्याकडे सोपविण्यात आला असून, प्रकरणातील सर्व पैलूंची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.