MAHA TET चा पेपर लीक; उद्याची परीक्षा रद्द, लाखो उमेदवारांना मोठा धक्का
मुंबई | देशभरात गाजलेल्या NEET पेपरफुटी प्रकरणाची धग अद्याप शांत झालेली नसतानाच महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET) चा पेपर ठाण्यात लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर शनिवार, २८ जून रोजी होणारी परीक्षा तातडीने रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे राज्यभरातील लाखो उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे. परीक्षेसाठी अनेक महिन्यांपासून तयारी करणाऱ्या उमेदवारांची मेहनत ऐनवेळी वाया गेल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावली लागू केली होती. मात्र, परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच पेपर लीक झाल्याची माहिती समोर आल्याने संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


पेपरफुटीची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे राज्यातील परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले असून विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
दरम्यान, रद्द झालेली MAHA TET परीक्षा पुन्हा कधी घेतली जाणार, याबाबत अद्याप कोणतीही नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे लाखो उमेदवार संभ्रमात असून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करत आहेत.
नीटनंतर आता MAHA TET परीक्षेतही पेपरफुटीची घटना समोर आल्याने राज्यातील स्पर्धा परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दोषींवर कठोर कारवाई करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी उमेदवारांकडून होत आहे.