जळगाव जिल्ह्यात पुढील ५ दिवस ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचा अंदाज

0

जळगाव । गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. त्यानंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी हवामान विभागाने जिल्ह्यासाठी दिलासादायक अंदाज वर्तविला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २८ जून ते २ जुलै या कालावधीत जळगाव जिल्ह्यात आकाश सर्वसाधारणपणे ढगाळ राहणार असून अधूनमधून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या कालावधीत कोणताही गंभीर हवामान इशारा देण्यात आलेला नसून ‘नो वॉर्निंग’ स्थिती कायम आहे.

तापमानाबाबत बोलायचे झाल्यास, २८ जून रोजी किमान तापमान २२ अंश सेल्सिअस तर कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. २९ आणि ३० जून रोजी किमान तापमान २२ अंश व कमाल ३५ अंश, तर १ आणि २ जुलै रोजी किमान तापमान २१ अंश आणि कमाल ३४ अंश सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसामुळे उकाड्याची तीव्रता काहीशी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच शेतकऱ्यांसाठीही हा पाऊस फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त केले आहे.

पावसामुळे कापूस लागवडीला गती

दरम्यान, गेल्या काही दिवसांतील पावसामुळे जिल्ह्यात खरीप पेरणीच्या कामांना मोठा वेग मिळाला आहे. विशेषतः कापूस लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे. १५ जूनपूर्वी अपेक्षित पाच लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे ५४ हजार हेक्टरवर कापूस लागवड पूर्ण झाली होती. त्यानंतर २२ जूनपर्यंत हा आकडा ८० हजार हेक्टरपर्यंत पोहोचला. गेल्या तीन दिवसांच्या पावसानंतर जिल्ह्यातील कापूस लागवडीने एक लाख हेक्टरचा टप्पा पार केला आहे.

पावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना गती दिली असून आगामी काही दिवसांत आणखी क्षेत्र लागवडीखाली येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.