गुन्हेगारी विश्वात खळबळ! जळगावात एकाच वेळी १२५ गुन्हेगारांवर पोलिसांची झडती

0

जळगाव । जळगाव शहरात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने आज मंगळवारी पहाटे मोठी धडक कारवाई केली. शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी राबविण्यात आलेल्या विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन’मध्ये तब्बल १२५ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईमुळे गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली असून शहरात पोलिसांचा वचक अधिक मजबूत झाल्याचे दिसून आले.

जळगाव शहरातील पोलिसांकडून आज पहाटे ३ ते सकाळी ६ या वेळेत शहर पोलीस ठाणे, शनिपेठ, एमआयडीसी, रामानंद नगर, जळगाव तालुका आणि जिल्हा पेठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे विशेष अभियान राबविण्यात आले. संवेदनशील भाग, संशयित ठिकाणे आणि गुन्हेगारांचे अड्डे पोलिसांनी पिंजून काढत अचानक छापेमारी केली.

या मोहिमेदरम्यान रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार, गंभीर गुन्ह्यांतील फरार आरोपी तसेच तडीपार आदेशाचे उल्लंघन करून शहरात वावरणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. पोलिसांच्या नियोजनबद्ध कारवाईत १२५ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडे पुढील चौकशी सुरू आहे.

पहाटेच्या सुमारास झालेल्या या अचानक कारवाईमुळे अनेक गुन्हेगारांना पळण्याची संधीही मिळाली नाही. पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी अशा कारवाया भविष्यातही सुरू राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. जळगाव पोलिसांनी गुन्हेगारीविरोधात स्वीकारलेल्या आक्रमक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत असून, शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही मोहीम प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.