मुंबई । राज्यात कोणतीही निवडणूक नसतानाही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. ठाकरे गटातील काही खासदार स्वतंत्र गट स्थापन करणार असल्याच्या चर्चांदरम्यान, शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील 16 आमदार आणि 7 खासदारांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अंतिम चर्चा पूर्ण झाली असून, आता केवळ प्रवेशाची तारीख ठरायची आहे, असा दावा त्यांनी केला आहे.

कृपाल तुमाने यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीबाबत नाराजी असल्याने संबंधित आमदार आणि खासदार शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. तसेच, ‘ऑपरेशन टायगर’ अंतिम टप्प्यात असून लवकरच मोठी राजकीय घडामोड घडेल, असेही त्यांनी म्हटले.


दरम्यान, अश्यातच उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान समोर आलं आहे. काल उद्धव ठाकरे यांनी खासदारांची बैठक घेतली. या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले, ज्याला जायचं आहे, त्याने खुशाल जावं. त्यांचं भलं व्हावं असेच मी म्हणेन. आज माझा नाही, पण उद्याचा दिवस नक्की माझा असेल. तोपर्यंत सोसाले लागेल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जे बाळासाहेबांची शिवसेना सोडून गेले आहेत, त्यांना नक्कीच पश्चाताप होईल. पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. पक्षात चार वर्षांपूर्वी मोठी फूट पडली. चाळीस आमदार फुटले. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो.
सर्वांना कुकळते ते मला माहीत नव्हते का? मला त्याची कुणकुण होती, पण मी कोणालाच बोललो नाही. कुणावरही दबाव टाकला नाही. त्यांच्या घोटाळ्याच्या फाईल केल्या नाहीत. ज्यांना जायचे आहे, त्यांना जबरदस्तीने हात धरून थांबवण्यात काय अर्थ आहे? असेही उद्धव ठाकरे म्हणाले.