चायवाला : दादर ते टिटवाळा व्हाया वडनगर ते दिल्ली !
काय योगायोग आहे पहा. ‘अमृततुल्य चहा’, ‘येवले चहा’, ‘फोजी चहा’अशी फलके ठिकठिकाणी हल्ली दिसताहेत. देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र दामोदरदास मोदी हे अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करते झाले तसेच दादरच्या केशवसुत उड्डाणपुलाखालच्या पदपथावर सुमारे ऐंशी च्या दशकात बबनशेठ चहा विकायचे. या बबनशेठ चहावाले यांनी सुद्धा वयाची ७५ वर्षे पूर्ण केली. बबनशेठ यांच्या चहाचा ठेला हा रात्रभर दादर पश्चिमेला पदपथावर सुरू असे. त्यामुळे वर्तमानपत्रात काम करणारे सारेच जण या चॉकलेट आणि तत्सम चहाची लज्जत घेण्यासाठी या ठिकाणी येत असत. तिथे भेदाभेद नव्हता अगदी संपादकांपासून वार्ताहरापर्यंत हा बबनशेठचा चहा पिण्यासाठी येत असत. मग सोबतीला कांदेपोहे मिळाले तरी ते आठवणीने घेत असत. बबनशेठ केमकर यांच्या चहाचा ठेला (स्टॉल) कुठे तर सूर्यकांत लाडे यांच्या दूरध्वनी ठेल्या (स्टॉल) जवळ. गेल्या काही वर्षांत बबनशेठ यांचा ठावठिकाणा लागत नव्हता. मित्रवर्य संजीव साबडे यांनी या संदर्भातील विस्तृत लेख मार्मिक मध्ये दिला आहे. नांदेडच्या श्रमिक एकजूट ने तो साभार पुनर्मुद्रित केला आहे. मित्रवर्य समीर परांजपे यांनी तर कमालच केली. वृत्तपत्र छायाचित्रकार गजानन दुधलकर यांनी बबनशेठ यांचा ठावठिकाणा शोधून काढला.
बबनशेठ हल्ली महागणपती च्या टिटवाळा येथे मुक्कामास असतात आणि त्यांनी सुद्धा वयाची ७५ वर्षे पूर्ण केल्याचे कळताच गजानन दुधलकर यांनी दादरच्या त्याच ऐतिहासिक पदपथावर बबनशेठ यांना सन्मानित करण्याचे ठरविले. पण त्यासाठी उचापती भरपूर कराव्या लागणार होत्या. महापालिकेच्या, पोलिसांच्या परवानग्या मिळतील कां ? हे सारे प्रश्न उभे राहिले. पण म्हणतात ना, कठीण समय येता कोण कामास येतो ? अरे आपले संदीप चव्हाण ! मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष झाल्यापासून मित्रवर्य संदीप चव्हाण यांनी जी जोरदार फलंदाजी सुरु केली आहे की ज्याचे नांव ते. संदीप चव्हाण यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाचे सभागृह उपलब्ध करून दिले. पद्मश्री माजी खासदार कुमार केतकर आणि माजी आमदार कपिल पाटील यांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केले. संदीप चव्हाण, प्रसाद मोकाशी, दिवाकर शेजवळ, समीर परांजपे, महेश म्हात्रे, सदानंद खोपकर, उदय तानपाठक, ज्योती उर्फ स्नेहल मसूरकर, समाधान पारकर, स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे यांच्यासह अनेक जण पुढे आले. व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर, प्रदीप म्हापसेकर, विजय तारी आदींनी हातभार लावला. सगळ्यांच्या अंगात राज ठाकरे संचारले होते असेच जणू वाटत होते. कारण इव्हेंट करणे हा तर राज ठाकरे यांच्या डाव्या हातचा मळ.


संदीप चव्हाण यांनी मुनाफ पटेल, स्नेहल, प्रमोद, सुरेश, दया पासून सर्वांना हाताशी धरीत सेल्फी पॉईंट पासून पुस्तका पर्यंत आणि खास करून ज्या चहाच्या पेल्यात सारेच जण चहा प्यायचे तोच चहाचा पेला या ठिकाणी सर्वांना द्यायचा, चहाही द्यायला मागे पुढे पाहिले नाही. अगदी कांदेपोहे सुद्धा दिमतीला हजर. मुंबई आणि मुंबईतले पदपथ हा ऐतिहासिक ठेवा आहे. या पदपथावर सामान्य माणूस उदरनिर्वाह करतो. इथे जातीभेदाच्या भिती गळून पडतात. जातीभेदाला थारा नसतो. याच गोष्टी कुमार केतकर यांनी बबनशेठ यांच्या अमृतमहोत्सवी सन्मान सोहळ्यात अधोरेखित केल्या. अस्सल चहावाला असतो तो चहाच्या पेल्यात भांड्यातून उजवा हात उंचावर नेत डाव्या हातातील पेल्यात असा काही चहा ओततो ते दृश्य पहाणारा खराच भाग्यवान. कुमार केतकर यांनी मोठमोठ्या हॉटेलमध्ये रुमाली रोटी बनविणारा कशी उंचावर नेत रोटी बनवितो तद्वतच बबनशेठ ची ही चहा ओतण्याची कला आपल्या भाषणात सांगितली. एका सर्वसामान्य चहावाल्या बबनशेठ केमकर यांचा तमाम वृत्तपत्र सृष्टीतील पत्रकारांनी एकत्र येऊन जो सन्मान घडवून आणला त्याला तोड नाही.
हा देवदुर्लभ सोहोळा साजरा होतांना त्यात सहभागी होण्याचे भाग्य लाभले, हेच महत्त्वाचे. व्यंगचित्रकार प्रभाकर वाईरकर यांनी या बबनशेठ केमकर यांना कधी पाहिले नाही किंवा त्यांच्या चहाची लज्जत चाखली नाही परंतु एका छायाचित्रावरुन प्रभाकर वाईरकर यांनी बबनशेठ केमकर यांचे जे अर्कचित्र रेखाटले ते अत्यंत सुंदर, जबरदस्त ! बबनशेठ केमकर यांच्या अमृतमहोत्सवी सन्मान सोहळ्यात प्रभाकर वाईरकर आणि बबनशेठ केमकर यांची पहिल्यांदाच भेट झाली. ते भव्य दिव्य अर्कचित्र या समारंभात बबनशेठ आणि त्यांच्या सुविद्य पत्नींना देण्यात आले. या संदर्भात जगदीश खेबुडकर यांची आठवण येते. अष्टविनायका तुझा महिमा कसा ? हे गीत कविवर्य जगदीश खेबुडकर यांनी लिहिले पण त्यांनी अष्टविनायकापैकी एकही गणपती पाहिला नाही पण ते अष्टविनायका तुझा महिमा कसा हे गीत आज सर्वतोमुखी झाले आहे. तद्वतच प्रभाकर वाईरकर यांनी रेखाटलेल्या बबनशेठ केमकर यांच्या अर्कचित्राचे म्हणता येईल. प्रभाकर वाईरकर हे अतिशय साधे गृहस्थ. त्यांनी कधी उपनगरी गाडीत प्रथम दर्जाच्या डब्यातून प्रवास केलेला नाही. पण विजय तारी यांनी त्यांना तो २७ एप्रिल २०२६ रोजी रात्री चर्चगेटहून आठ वाजून एक मिनिटांच्या बोरीवली लोकलने घडवून आणला. मी विजय तारी यांना सांगितले की बबनशेठ केमकर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षांत प्रभाकर वाईरकर पहिल्यांदाच प्रथम दर्जाच्या प्रवासात.
बबनशेठ ची पहिली भेट प्रभाकरपंतांना फळली म्हणायची. या निमित्ताने योगायोग म्हणजे देशाचे प्रधानसेवक हे वडनगर रेल्वे स्थानकात दामोदरदास मोदी यांना चहा विकण्यासाठी मदत करायचे आणि एक चायवाला पंतप्रधान बनू शकतो असे निवडणूक प्रचारात म्हणायचे. त्याच्यावर बरीच मल्लिनाथी झाली, टीकाटिप्पणी झाली. इतकेच काय तर सुंदर पिचाई यांनी निर्माण केलेल्या गुगलवर या बाबतीत बऱ्याच उलटसुलट गोष्टी वाचायला मिळतात. नरेंद्र मोदी यांचे बंधुराज प्रल्हाद मोदी यांनी तर ठासून सांगितले की नरेंद्रभाईए क्यारेपण चा वेंची नथी. (नरेंद्र मोदी यांनी कधीच चहा विकलेला नाही). असो पण नरेंद्र मोदी हे विरोधकांच्या टीकेच्या अग्रस्थानी आहेत. नरेंद्र मोदी हे देशाच्या शीर्षस्थ सत्तास्थानी आहेत परंतु आमचा बबनशेठ केमकर उर्फ बबन चहावाला यांनी सर्वांच्या ह्रुदय सिंहासनावर विराजमान होण्याचे काम केले आहे. म्हणूनच म्हटले आहे की ‘चायवाला : दादर ते टिटवाळा व्हाया वडनगर ते दिल्ली ! बबनशेठ केमकर यांना उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो या मनःपूर्वक शुभेच्छा
-योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.
(लेखक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आहेत)