अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा निलंबित

0

 

जळगाव : सावखेडा (ता. अमळनेर) येथील वाळू घाटावर नियमबाह्य पद्धतीने मशीनच्या माध्यमातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याचा प्रकार २६ मे रोजी उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मंडळाधिकाऱ्यांसह तलाठ्याला तत्काळ निलंबित केले. त्यानंतर या गंभीर प्रकाराचा चौकशी अहवाल शासनाकडे सादर केला. त्यानुसार महसूल विभागाने अमळनेरचे तहसीलदार रूपेशकुमार सुराणा यांना निलंबित केले असून, तसे आदेश गुरुवारी दुपारी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत.

२६ मे रोजी महसूल व पोलिस प्रशासनाने हा गंभीर प्रकार उघडकीस आणला होता. त्यानंतर सावखेडा येथील मंडलाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निलंबित केले होते. अमळनेरचे प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांना चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश होते. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल प्राप्त होताच त्यांनी अमळनेर व चोपडा तहसीलदारांचा चौकशी अहवाल शासनाकडे सादर केला होता. त्यानुसार महसूल विभागाने अमळनेरचे तहसीलदार सुराणा यांना निलंबित केले आहे.

मे महिन्यातच जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव पाठविला होता. मात्र मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असल्याने ही कारवाई उशिराने झाल्याचे सांगण्यात आले. या कारवाईनंतर चोपड्याचे तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यावर काय कारवाई होते, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.