सोन्याच्या बिस्किटांच्या व्यवहाराचा संशय; दोन तरुण पोलिसांच्या ताब्यात, १०.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

जळगाव : सोन्याच्या बिस्किटांच्या खरेदी-विक्रीच्या संशयासह फिरणाऱ्या दोन तरुणांना जळगाव शहर वाहतूक शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड, बुलेट मोटारसायकल, दोन मोबाईलसह एकूण १० लाख १५ हजार १२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १६ नोव्हेंबर रोजी रात्री मुजुमदार रोड परिसरात करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या निर्देशानुसार शहरातील संशयास्पद हालचालींवर पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, काही इसम सोन्याचे बिस्किट घेऊन त्याची परस्पर विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस कॉन्स्टेबल इम्रान रहीम बेग आणि मंगल नथ्थू साळुंखे यांनी मुजुमदार रोड परिसरात सापळा रचला.

१६ नोव्हेंबर रोजी रात्री ८.२० वाजण्याच्या सुमारास बुलेट मोटारसायकलवरून जाणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांची नावे हरीप राजेंद्र महाजन (वय ३०) आणि सुजित गोकुळ महाजन (वय २६), दोघेही रा. मंदिरा, अडावद, ता. चोपडा, जि. जळगाव अशी असल्याचे समोर आले.

त्यांच्याकडील हिरवट करड्या रंगाच्या बॅगेची झडती घेतली असता १०० आणि ५०० रुपयांच्या नोटांसह एकूण ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड आढळली. या रकमेबाबत समाधानकारक खुलासा न झाल्याने पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८७/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ५ लाख ५० हजार रुपयांची रोकड, २ लाख ५० हजार रुपये किमतीची बुलेट मोटारसायकल, ६५ हजार रुपयांचा आयफोन, २८ हजार रुपयांचा विवो मोबाईल, २ हजार १२० रुपयांच्या विविध चलनी नोटा आणि एक वापरती बॅग यांचा समावेश आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंडाम यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कामगिरी केली. पोलिसांनी कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.