भुसावळात पोलीस आणि RPF चे संयुक्त ‘कॉम्बिंग ऑपरेशन’

0

जळगाव : भुसावळ शहर व परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी तसेच रेल्वे परिसरातील भंगार, कोळसा आणि केबल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांनी संयुक्तपणे पहाटे विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबवले. पहाटे ४ ते सकाळी ८ या वेळेत झालेल्या या कारवाईत सराईत गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्यात आली.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारवले यांच्या नेतृत्वात ही मोहीम पार पडली. या कारवाईत रेल्वे पोलिसांच्या गुन्ह्यातील नॉन-बेलेबल वॉरंट (NBW) असलेला सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाठ उर्फ श्याम काळ्या याला अटक करण्यात आली.

याचदरम्यान भुसावळ बाजारपेठ परिसरात कारवाई करताना शोफीक शहा शरीफ शहा याच्याकडून अवैध कट्टा जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.

दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील केबल चोरीच्या प्रकरणाचाही पोलिसांनी उलगडा केला. या प्रकरणात राजू मुरकुटे (रा. निंभोरा) याच्याकडून सुमारे ५० किलो चोरीची केबल आणि केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले असून चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

मोहीमेदरम्यान रेल्वे आणि दीपनगर परिसरातील ६० रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच २५ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. याशिवाय भंगार दुकाने आणि गोदामांची तपासणी करून गुन्हेगारी हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले.

या कारवाईत पकडलेल्या आरोपींची अद्ययावत डिजिटल नोंद तयार करून जळगाव पोलीस आणि RPF यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यात आली आहे. भविष्यात रेल्वे मालमत्तेची चोरी, भंगार चोरी आणि इतर गुन्ह्यांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी अशा संयुक्त मोहिमा सातत्याने राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.