जळगाव शहरात भीषण अपघात; युवकाचा जागीच मृत्यू, चार जण गंभीर जखमी

0

जळगाव । जळगाव शहरातील इच्छादेवी चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर आज बुधवारी (२९ जुलै) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकन झालेल्या या दुर्घटनेत एमआयडीसी कंपनीतील एका ३६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. लीलाधर मंगल पाटील (वय ३६, रा. कठोरा, ता. जळगाव, सध्या रा. चंदू अण्णानगर, जळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.

कशी घडली घटना?

मिळालेल्या माहितीनुसार, लीलाधर पाटील हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या दुचाकीने (एमएच १९ ईसी ९०८४) जळगाव शहरातील एमआयडीसी भागातील निर्मल पाईप कंपनीत कामावर जाण्यासाठी निघाले होते. ते इच्छादेवी चौक परिसरातील राष्ट्रीय महामार्गावरून जात असताना, मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने (एमएच १९ बीएल ७०७७) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की, धडकेनंतर कारने सलग दोनदा पलटी घेतली. या अपघातात दुचाकीस्वार लीलाधर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर या घटनेत अन्य चार जण गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीने पुढे येत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यास मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनाम्याची प्रक्रिया सुरू केली.

अपघात झाल्यानंतर मृत लीलाधर पाटील यांचा मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी रुग्णालयात जमलेल्या नातेवाईकांचा आणि कुटुंबीयांचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. मृत लीलाधर यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

याप्रकरणी वृत्त लिहिपर्यंत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.