जळगावातील घरफोडीचा उलगडा; ७० हजारांच्या मुद्देमालासह दोन अट्टल चोरटे जेरबंद

0

जळगाव । जळगाव शहरातील मलीक नगर परिसरात झालेल्या घरफोडीचा अवघ्या दोन दिवसांत छडा लावत एमआयडीसी पोलिसांनी दोन अट्टल चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि तीन मोबाईल फोन असा एकूण ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला आहे.

मध्यरात्री घरफोडी करून दागिने व मोबाईल लंपास

मलीक नगरातील बॉम्बे बेकरीच्या मागील भागात राहणाऱ्या एका कुटुंबाच्या घरात २५ जुलैच्या रात्री ११.३० ते २६ जुलैच्या पहाटे ४.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. घरातील सोन्याचे दागिने आणि तीन मोबाईल फोन चोरी करून चोरटे पसार झाले. या प्रकरणी पीडित व्यक्तीच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेअंतर्गत घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तांत्रिक तपासातून आरोपींचा शोध

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली. घटनास्थळावरील तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढला.

त्यानुसार २८ जुलै रोजी मास्टर कॉलनी परिसरात सापळा रचून संशयित आदिल खान सादिक खान (वय ३०) आणि अरजान उर्फ दालचावल खान अक्रम खान (वय ३०, दोघेही रा. मास्टर कॉलनी, जळगाव) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान दोघांनीही घरफोडीची कबुली दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपींकडून पोलिसांनी सोन्याचे पान, कानातील सोन्याचे टॉगल तसेच विवो आणि रेडमी कंपनीचे तीन मोबाईल फोन असा सुमारे ७० हजार रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.