नरहरी झिरवळांच्या माजी सचिवांवर निलंबनाची कारवाई

0

मंत्रालयातील कथित लाचखोरीच्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे माजी खाजगी सचिव डॉ. रामदास गाडे यांना शासनाने निलंबित केले आहे. शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली असून, मुख्यमंत्री कार्यालयाच्या सूचनेनंतर संबंधित विभागाने निलंबनाचा आदेश जारी केल्याची माहिती आहे.

पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय विभागाने गुरुवारी यासंदर्भातील आदेश काढला. निलंबनाचा आदेश जारी झाला त्यावेळी डॉ. गाडे हे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९७९ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

या कारवाईमागे फेब्रुवारी २०२४ मध्ये मंत्रालयात समोर आलेले कथित लाचखोरीचे प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात झालेल्या स्टिंग ऑपरेशननंतर हे प्रकरण चर्चेत आले होते. त्यानंतर डॉ. गाडे यांना प्रतिनियुक्तीवरून कार्यमुक्त करून त्यांच्या मूळ विभागात पाठवण्यात आले होते.

मेडिकल स्टोअर मालकाच्या तक्रारीनंतर प्रकरण चर्चेत

हे प्रकरण निर्मल शर्मा या मेडिकल स्टोअर चालकाच्या तक्रारीमुळे समोर आले होते. औषधांसाठी वापरल्या जाणाऱ्या रेफ्रिजरेटरमध्ये पाण्याच्या बाटल्या आणि ओआरएसची पाकिटे ठेवण्यात आल्याचे आढळल्याने त्यांच्या दुकानाचा परवाना एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आला होता. या निर्णयाविरोधात शर्मांनी ७ फेब्रुवारी रोजी मंत्रालयात अपील दाखल केले. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी सुनावणीसाठी ते मंत्रालयात गेले होते. यावेळी त्यांना डॉ. रामदास गाडे यांच्या केबिनमध्ये बसवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

शर्मांच्या तक्रारीनुसार, याच ठिकाणी राजेंद्र धेरांगे नावाच्या एका कारकुनाने त्यांच्याकडे कथितरित्या १ लाख १० हजार रुपयांची लाच मागितली. यातील १ लाख रुपये वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी, तर १० हजार रुपये स्वतःसाठी असल्याचे सांगण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर ही रक्कम कमी करून निम्मी करण्याची चर्चा झाल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. शर्मांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी २ हजार रुपये ऑनलाइन आणि ५३ हजार रुपये रोख स्वरूपात दिले. या संपूर्ण प्रकाराचे स्टिंग ऑपरेशन समोर आल्यानंतर मंत्रालयातील कथित लाचखोरीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. या प्रकरणानंतर डॉ. गाडे यांना त्यांच्या पदावरून हटवून मूळ विभागात पाठवण्यात आले होते. आता शिस्तभंग आणि गैरवर्तणुकीच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.