नागोसलीत घरकुल योजनेवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप असून विरोधी गटातील असल्याने घरकुल नाकारल्याचा ग्रामस्थांचा आरोप
येत्या आठ दिवसांत ग्रामसभा घेऊन चौकशी करून पात्र लाभार्थ्यांनाच घरकुल देण्याचे गटविकास अधिकाऱ्यांचे आश्वासन.

इगतपुरी तालुक्यातील नागोसली येथे घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीवरून वाद निर्माण झाला असून, सत्ताधारी गटाकडून राजकीय आकसापोटी विरोधी गटातील ग्रामस्थांना घरकुल योजनेपासून जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात गुरुवारी ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन घरकुल मंजुरी प्रक्रियेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.


नागोसली गावातील घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आम्ही विरोधी गटातील असल्याने आमची घरकुले हेतुपुरस्सर नामंजूर करण्यात आली, तर यापूर्वीच घरकुल योजनेचा लाभ घेतलेल्या काही व्यक्तींना पुन्हा घरकुल मंजूर करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला. विशेष म्हणजे, गावात बंगले आणि चारचाकी वाहने असलेल्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व्यक्तींनाही घरकुल योजनेचा लाभ देण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
शासनाच्या घरकुल योजनेचा मूळ उद्देश बेघर, गरीब आणि गरजू कुटुंबांना हक्काचे घर उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, नागोसली येथे पात्र आणि गरजू लाभार्थ्यांना डावलून अपात्र व्यक्तींना लाभ दिला जात असल्याचा आरोप होत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे घरकुल मंजुरीची संपूर्ण यादी, लाभार्थ्यांची आर्थिक परिस्थिती आणि प्रत्यक्ष पात्रता तपासण्याची मागणी करण्यात आली.
दरम्यान, ग्रामस्थांच्या तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी येत्या आठ दिवसांत ग्रामसभा घेऊन संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन दिले. तसेच चौकशीनंतर केवळ पात्र लाभार्थ्यांनाच घरकुल योजनेचा लाभ दिला जाईल असे आश्वासन गटविकास अधिकारी महेश वाळवी यांनी दिले.