जळगावात श्रीराम रथोत्सवाचा जल्लोष; दर्शनासाठी राज्यभरातून भाविक दाखल
जळगाव। जळगाव शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराच्या १५४ वर्षांच्या अखंड रथोत्सव परंपरेला कार्तिकी एकादशीच्या मुहूर्तावर उत्साहात सुरुवात झाली. रथोत्सवानिमित्त शहरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक जळगावात दाखल झाले आहेत.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने श्रीराम रथोत्सवाचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची वर्दळ वाढली होती. श्रीरामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. जय श्रीरामच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.


मंदिराची आकर्षक सजावट
रथोत्सवानिमित्त श्रीराम मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. फुलांची सजावट तसेच रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने संपूर्ण मंदिर परिसर उजळून निघाला आहे. या सजावटीमुळे मंदिराचे सौंदर्य अधिक खुलून दिसत असून, भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. श्रीराम रथोत्सवानिमित्त आयोजित पूजाविधी आणि कार्यक्रमाला मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेश जैन, आमदार सुरेश भोळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
मान्यवरांच्या उपस्थितीत रथोत्सवाच्या कार्यक्रमाला अधिकच उत्साह आला.जळगावच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असलेला हा श्रीराम रथोत्सव गेल्या १५४ वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत हा ऐतिहासिक वारसा जपला आहे.