अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांसाठी मोफत प्रशिक्षण

0

जळगाव  | आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, रावेर यांच्यामार्फत अनुसूचित जमातीतील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण १ डिसेंबर २०२६ ते १५ मार्च २०२७ या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

प्रशिक्षणासाठी उमेदवार अनुसूचित जमातीचा व महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार किमान दहावी उत्तीर्ण आणि वयाची १८ वर्षे पूर्ण केलेला असावा. प्रवेशासाठी जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.

या प्रशिक्षणामध्ये विविध शासकीय व निमशासकीय निवड समित्यांमार्फत घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करून घेतली जाणार आहे. प्रशिक्षण काळात उपस्थितीनुसार दरमहा एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येणार असून, प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर चार पुस्तकांचा मोफत संच व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी इच्छुक उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रवेशासाठी २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. उमेदवारांनी मुलाखतीस शाळा सोडल्याचा दाखला, दहावी, बारावी व पदवीच्या गुणपत्रिका, आधार कार्ड, बँक पासबुक, दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आणि अनुसूचित जमातीचा जात दाखला या कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रतींसह स्वखर्चाने उपस्थित राहावे.

प्रशिक्षणाच्या कालावधीत उमेदवारांना राहण्याची व भोजनाची व्यवस्था स्वतः करावी लागेल. अधिक माहितीसाठी आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्लॉट क्रमांक २, शनि मंदिरामागे, स्टेशन रोड, पंचायत समितीजवळ, रावेर येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२५८४-२५१९०६ वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा असे क.कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, रावेर, अरुण ठाकरे यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.