जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण

0

जळगाव । गणेशोत्सवाच्या काळात सलग दोन दिवस दरवाढीनंतर गुरुवारी जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. बाजारपेठ उघडताच दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमती खाली आल्याने दागिने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

बुधवारी दिवसभरात सोन्याच्या दरात ₹१,५४५ रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचा दर तीन टक्के जीएसटीसह ₹१,५७,२८१ प्रति १० ग्रॅम इतका झाला होता. मात्र, गुरुवारी सकाळच्या व्यवहारात सोन्याच्या दरात थेट ₹१,७५१ची घसरण झाली. परिणामी २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह ₹१,५५,५३० प्रति १० ग्रॅमवर आला.

चांदीही ₹३,०९० ने घसरली

सोन्याबरोबरच चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. बुधवारी चांदीच्या दरात ₹३,०९० रुपयांची वाढ झाली होती. त्यामुळे तीन टक्के जीएसटीसह चांदीचा दर ₹२,४१,०२० प्रति किलोवर पोहोचला होता.मात्र, गुरुवारी सकाळी बाजार सुरू होताच चांदीच्या दरात पुन्हा ₹३,०९०ची घट झाली. त्यामुळे चांदीचा भाव जीएसटीसह ₹२,३७,९३० प्रति किलोवर आला.

फेडच्या निर्णयाचा जागतिक बाजारावर परिणाम

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने १५-१६ सप्टेंबरच्या FOMC बैठकीत व्याजदरात २५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली. त्यामुळे फेडरल फंड्सचा लक्ष्य दर ३.७५ ते ४ टक्के झाला आहे. या निर्णयानंतर डॉलर आणि अमेरिकी रोख्यांच्या उत्पन्नात झालेल्या हालचालींचा परिणाम जागतिक बुलियन बाजारावर झाला.आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोन्याच्या दरात मोठी अस्थिरता पाहायला मिळाली. काही टप्प्यांवर सोन्याचा भाव ४,३०० डॉलरच्या आसपास आला. चांदीच्या दरावरही दबाव दिसून आला.

एमसीएक्सवरही सोने-चांदी दबावात

फेडच्या दरवाढीचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून आला. एमसीएक्सवर गुरुवारी सकाळच्या व्यवहारात सोन्याच्या किमतीत सुमारे ₹२,००० प्रति १० ग्रॅम, तर चांदीच्या दरात सुमारे ₹४,६०० प्रति किलोपर्यंत घसरण झाली.आगामी काळात फेडचे व्याजदर, अमेरिकी डॉलरची दिशा आणि अमेरिकेतील महागाईची स्थिती यांचा सोने-चांदीच्या दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेतील पुढील काही दिवसांच्या दरांकडे ग्राहकांसह सराफ व्यावसायिकांचेही लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.