शिरपूर – चोपडा रस्त्यावर भीषण अपघात, चार मजुर ठार

0

शिरपूर-चोपडा मार्गावरील सावेर गावाच्या शिवारात भीषण अपघात घडला आहे. भरधाव मालमोटारीने मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिल्याने चार जणांचा मृत्यू झालाय. हे चारही जण मध्य प्रदेशातील असून लुमरीया लालसिंग भिलाला (२५) व इसराम कालू भिलाला (४८, दोन्ही रा. बुद्रा, ता. राजपूर, जि. बडवानी), सुरेश रमेश कनासे (२६) आणि महेश लालसिंग कनासे (३१, रा. बालिया, ता. सनावद, जि. खरगोन, मध्य प्रदेश) अशी अपघातात ठार झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. अपघातानंतर मालमोटार चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.

पन्नालाल कालूराम सिसोदिया यांनी थाळनेर ठाणे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार इसराम भिलाला हे या तिघांना सोबत घेऊन मोटारसायकल (क्र. एमपी-१०-झेडएन-३२२६) वरून शिरपूरकडून चोपड्याकडे जात होते. १३ सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास सावेर गावाच्या शिवारात (ता.शिरपूर) चोपड्याकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या मालमोटारीने (क्र. एचआर-५५-एटी- १३५५) मोटारसायकलला समोरून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, मोटारसायकलवरील चौघांनाही गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मालमोटार चालक घटनास्थळावरून पसार झाला. दरम्यान, जखमींना तातडीने शिरपूर आणि धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान चौघांचा मृत्यू झाला.

मृत सर्वजण मध्य प्रदेशातील असल्याने त्यांच्या नातेवाइकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या भीषण अपघातामुळे शिरपूर-चोपडा मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू असून घटनेचा अधिक तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.