वरणगाव हादरले! १३ वर्षांच्या मुलीवर वर्षभर लैंगिक अत्याचार; ४ आरोपी अटकेत
भुसावळ । खाऊचे आमिष दाखवून एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर वर्षभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथून समोर आली आहे. या प्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत चार संशयितांना अटक केली आहे. तर एका विधीसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) बालकाविरुद्ध बाल न्याय कायद्यानुसार प्रक्रिया सुरू केली आहे.

पीडित मुलगी अवघ्या १३ वर्षांची आहे. संशयितांनी तिला वेळोवेळी खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून संपर्क वाढवला आणि तिला विविध ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. प्राथमिक तपासानुसार, हा प्रकार वर्षभरात वेगवेगळ्या प्रसंगी घडला आहे. सर्व संशयितांनी स्वतंत्रपणे अत्याचार केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यामुळे सामूहिक बलात्काराचे कलम लावण्यात आलेले नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


तक्रार प्राप्त होताच वरणगाव पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवून चार प्रौढ संशयितांना ताब्यात घेतले. पोलीस सध्या त्यांची कसून चौकशी करत असून घटनेचा संपूर्ण घटनाक्रम, पीडितेला नेण्यात आलेली ठिकाणे आणि पुरावे गोळा करण्याचे काम वेगाने सुरू आहे.या गुन्ह्यात एका विधीसंघर्षग्रस्त मुलाचे नाव समोर आले असून, त्याच्यावर बाल न्याय मंडळाच्या नियमांनुसार स्वतंत्रपणे कायदेशीर कारवाई केली जात आहे.पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार तिची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. हे प्रकरण अत्यंत संवेदनशील असल्याने नागरिकांनी अधिकृत माहितीशिवाय कोणत्याही अफवांवर किंवा चर्चेवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन वरणगाव पोलिसांनी केले आहे.