कुंभमेळ्याच्या नावाने ५९१ कोटींचे बनावट टेंडर; जामनेरच्या दोघांना अटक

0

जळगाव । आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या कामांच्या खोट्या वर्क ऑर्डर दाखवून कंत्राटदारांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या मोठ्या रॅकेटचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या हायप्रोफाईल फसवणूक प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथून दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तनय महाजन आणि नरेंद्र महाजन असं अटक केलेल्या संशयितांची नावे असून या कारवाईने खळबळ उडाली आहे.

५९१ कोटींचे बनावट टेंडर अन् डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट सही
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेऊन या संपूर्ण अपहाराचा खुलासा केला होता. विभागीय आयुक्त तथा कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम यांची बनावट सही आणि शिक्के वापरून तब्बल ५९१ कोटी रुपयांचे खोटे टेंडर तयार करण्यात आले होते. तीन नामांकित कंत्राटदारांना ही कामे मिळवून देण्याचे आमिष दाखवून संशयितांनी त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी ५ लाख रुपये उकळले.

खात्यात पैसे जमा; पोलिसांची धडक कारवाई
तपासादरम्यान कंत्राटदारांनी दिलेली कोट्यवधींची रक्कम थेट संशयितांच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. नाशिक गुन्हे शाखेने तातडीने तपासाची चक्रे फिरवत जळगाव गाठून दोन्ही मुख्य आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

आणखी आरोपी जाळ्यात येण्याची शक्यता
या आंतरजिल्हा फसवणुकीच्या गुन्ह्यात आणखी काही बड्या हस्तकांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिक पोलीस या प्रकरणाचा अत्यंत सखोल तपास करत असून, लवकरच काही नवीन खुलासे आणि अतिरिक्त अटक होण्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण यांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.