कुंभमेळ्याच्या कामांत ५९१ कोटींचा घोटाळा? काँग्रेसने केली मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका

0

मुंबई : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांच्या नावाखाली तब्बल ५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांकडून ३ कोटी रुपयांहून अधिक रक्कम उकळल्याचा आरोप असलेले प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात तनय महाजन याला जामनेर येथून अटक करण्यात आली आहे. तनय महाजन हा राज्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे.

या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर आता राजकीय वातावरणही तापले आहे. काँग्रेसने राज्य सरकार आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार टीका करत या प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वर पोस्ट करत सरकारला लक्ष्य केले. “कुंभमेळा हा श्रद्धेचा उत्सव आहे की सत्ताधाऱ्यांच्या कमाईचा मेळा?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

५९१ कोटी रुपयांच्या बनावट वर्क ऑर्डर्सचे वृत्त अत्यंत गंभीर असल्याचे सांगत गायकवाड यांनी सरकारी तिजोरीच्या गैरवापराबाबत प्रश्न उपस्थित केले. कागदावर कामे, बनावट कागदपत्रे आणि सरकारी यंत्रणेला अंधारात ठेवून वर्क ऑर्डर काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.

‘नातेवाईकापासून हात झटकून चालणार नाही’

“मंत्री महोदयांनी नातेवाईकापासून हात झटकले आहेत. मात्र, या ऑर्डर्स निघेपर्यंत सरकार आणि प्रशासन काय करत होते?” असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केला. या कथित गैरव्यवहारातील पैसा कुणाकडे गेला आणि हे प्रकरण कोणाच्या आशीर्वादाने घडले, याचा हिशोब जनतेला मिळाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या प्रकरणावरून सरकारला घेरले. “कुंभमेळा श्रद्धेचा मेळा की भ्रष्टाचाराचा मेळावा?” असा सवाल त्यांनी केला. शेकडो कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर्स काढल्या जात असताना प्रशासन झोपले होते का? बनावट टेंडरच्या माध्यमातून एवढा मोठा गैरव्यवहार होत असताना जबाबदार अधिकारी कोण आहेत, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

या प्रकरणातील आरोपींना कोणाचे राजकीय संरक्षण आहे, याची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये पारदर्शकता राखण्याची मागणीही काँग्रेस नेत्यांनी केली आहे.दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता तपासण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.