विधान परिषदेसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला? कोणाच्या वाट्याला किती जागा?

0

मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अखेर सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेनंतर जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण १७ जागांसाठी निवडणूक होत असून, या जागांवरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मोठे यश मिळवल्याने अधिक जागांवर दावा केला होता. तर शिंदेसेनेनेही आपला वाटा कमी होऊ नये यासाठी जोर लावला होता.

भाजपच्या वाट्याला १० जागा?

सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपच्या वाट्याला तब्बल १० जागा जाण्याची शक्यता आहे. भाजप सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, वर्धा, चंद्रपूर-गडचिरोली आणि भंडारा-गोंदिया या मतदारसंघांत उमेदवार देण्याची शक्यता आहे.

शिंदेसेना आणि राष्ट्रवादीचा फॉर्म्युला

शिवसेना (शिंदे गट) ठाणे, नाशिक आणि यवतमाळ या जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला पुणे आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागा जाण्याची चर्चा आहे.

काही जागांवर अजूनही पेच

दरम्यान, संभाजीनगर, पुणे आणि जळगाव या जागांवर अजूनही तणाव कायम असल्याचे समजते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी काही जागा सोडण्यास नकार दिला असल्याची चर्चा आहे. जळगावमध्ये मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या मुलासाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. तर परभणी-हिंगोली मतदारसंघासाठी शिवसेनेचे नेते अर्जुनराव खोतकर यांनीही जोरदार लॉबिंग सुरू केल्याची माहिती आहे.

अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असल्याने आज संध्याकाळपर्यंत महायुतीच्या जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आता महायुतीच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.