जळगाव जिल्ह्यात वाळूमाफियांवर पोलिसांचा मोठा दणका; पहिल्याच दिवशी पाच ठिकाणी कारवाई

0

जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवैध वाळू उपसा आणि भरधाव वाहतुकीला लगाम घालण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन पूर्णपणे ‘अॅक्शन मोड’मध्ये आले आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार वाळूमाफियांविरोधात जिल्ह्यात विशेष धडक मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेच्या पहिल्याच दिवशी (२८ मे) पोलिसांनी वेगवेगळ्या ५ ठिकाणी छापे टाकून वाळूमाफियांचे कंबरडे मोडले आहे.

जिल्ह्यातील अनेक गावांना गिरणा नदीचे पात्र लागून असल्याने या भागातून मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत होती. ही चोरटी वाळू परजिल्ह्यात विकली जात होती, तसेच वाळूची ओव्हरलोड वाहने महामार्गावर भरधाव धावत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले होते. या त्रासातून जनतेची सुटका करण्यासाठी पोलिसांनी थेट कारवाईचा बडगा उचलला.

पहिल्याच दिवशी येथे झाल्या ५ मोठ्या कारवाया:
१. रामदेव वाडी (जळगाव-पाचोरा रोड): अवैध वाळूची वाहतूक करणारा डंपर जप्त करून गुन्हा दाखल.
२. सतखेडा फाटा (धरणगाव): दीड ब्रास अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले.
३. खडके ते खर्ची रोड (एरंडोल): अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून चालक व मालकावर गुन्हा दाखल.
४. मोजे गाव (पिंपळगाव हरेश्वर, पाचोरा): वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या डंपरवर धडक कारवाई.
५. कानळदा गाव (जळगाव तालुका): एक ब्रास अवैध वाळू घेऊन जाणारे ट्रॅक्टर पोलिसांनी केले जप्त.

वाळूमाफियांनो सावधान!
पोलिसांनी एकाच दिवशी केलेल्या या सलग पाच कारवायांमुळे जिल्ह्यातील वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. ही तर केवळ सुरुवात असून, पुढील काळात वाळूमाफियांची गय केली जाणार नाही आणि अशाच धडक कारवाया सुरू राहतील, असा कडक इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.