पत्रा चाळ रहिवाशांना म्हाडाकडून 10 टक्के भाडेवाढ देण्याचा निर्णय

0

इमारतीची आणि घरांची दुरुस्ती करून देण्याचे म्हाडाला निर्देश

कंत्राटदाराकडून दर्जेदार काम करून घेण्यासाठी म्हाडा अधिकारी आणि रहिवाशांची एकत्रित समिती

पत्रा चाळ परिसरात म्हाडाच्या माध्यमातून मंदिर उभारले जाणार

मुंबई | गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत रहिवाशांना १० टक्के भाडेवाढ देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी घेतला.

या बैठकीला नगरविकास विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, आमदार विद्या ठाकूर, खासदार रवींद्र वायकर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता, म्हाडाचे मिलिंद बोरीकर, शिव उद्योग सेनेचे उदय सावंत आणि पत्रा चाळीतील सर्व रहिवाशी उपस्थित होते.

पत्रा चाळ रहिवाशांच्या रखडलेल्या घरांचा प्रश्न म्हाडाच्या माध्यमातून सोडविण्यात आल्यानंतरही काही रहिवाशांनी या घरांचा ताबा घेतला नव्हता. याबाबत विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबत उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधीच्या अनुषंगाने आणि उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आजच्या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.

यात पत्रा चाळ रहिवाशांच्या मागणीनुसार त्यांना सध्या मिळत असलेल्या २५ हजार एवढ्या भाड्याच्या रक्कमेत १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच म्हाडाच्या इमारतींची डागडुजी करून त्यानंतर त्या हस्तांतरित करण्यात याव्या तसेच हा कंत्राटदार दर्जेदार काम करतो अथवा नाही हे पाहण्यासाठी म्हाडाचा अधिकारी आणि स्थानिक रहिवाशी यांची संयुक्त समिती स्थापन करून त्यांच्या माध्यमातून या कामावर देखरेख ठेवण्यात यावी असे निर्देश देण्यात आले आहेत. यासोबतच रहिवाशांना हवे आहे तशा मंदिराचा नकाशा त्यांनी म्हाडाकडे सुपूर्द करावा त्यानुसार म्हाडा नवीन मंदिर बांधून देईल असेही या बैठकीत निश्चित करण्यात आले.

खाजगी विकासकांनी पत्रा चाळ वासियांची फसवणूक केल्यानंतर म्हाडाने हा अर्धवट अवस्थेत असलेल्या इमारती ताब्यात घेऊन हा प्रकल्प पूर्ण करून दिला. रहिवाशांच्या मागणीनुसार त्यांना हव्या त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात यासाठी शासनाने कायम प्रयत्न केला असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. रहिवाशांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी तसेच त्यांचे आजवर झालेले नुकसान भरून निघावे यासाठी १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. तसेच कॉर्पस फंड कमी मिळत असल्याने म्हाडाने २३ अतिरिक्त सदनिका देखील पत्रा चाळ रहिवाशांना दिल्या असून त्यांच्या भाड्याच्या माध्यमातून अतिरिक्त कॉर्पस फंड उभा करण्यात येणार असल्याकडेही शिंदे यांनी लक्ष वेधले. पत्रा चाळीत दुरुस्तीची कामे पूर्ण झाल्यानंतर आपण स्वतः नवीन इमारतींना भेट देऊन केलेल्या कामांचा दर्जा तपासणार असल्याचे देखील शिंदे यांनी या बैठकीत स्पष्ट केले.

याशिवाय लिज फेव्हरमध्ये वाढवून देणेबाबत प्रलंबित असलेला विषयाबाबत माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील निर्णय घेतला जाईल असेही या बैठकीत शिंदे यांनी स्पष्ट केले.

Leave A Reply

Your email address will not be published.