धावत्या गाडीचं चाक निखळलं अन् होत्याचं नव्हतं झालं! भीषण अपघातात नववधूसह तिघांचा मृत्यू

0

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वराड गावाजवळील महामार्गावर बुधवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. धावत्या प्रवासी गाडीचे अचानक चाक निखळल्याने वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या खाली उतरली. या भीषण अपघातात नववधूसह तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

या दुर्घटनेत पूजा रवी वागडकर (२२), दत्तू तुळशीराम भागवत (४२) आणि जगदीश चंद्रभान वागडकर (५२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रेम भारत वाकडकर (२४), नितेश सुरेश काठोडे (३५), अमोल दामोदर गीते (३५), रवी प्रभाकर वाघोडकर (३२), तुळशीराम भीमराव भागवत (६७) आणि अंश नितेश काठोडे (१४) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील वापी येथे विवाह सोहळा पार पडल्यावर नववधू पूजा प्रथमच आपल्या माहेरी अकोल्याकडे नातेवाईकांसह परतत होती. आनंदाच्या वातावरणात सुरू झालेल्या या प्रवासावर अचानक दुर्दैवी अपघाताचे सावट आले. बुधवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास वराड गावाजवळ गाडी वेगात असताना अचानक एक चाक निखळल्याने वाहनाचा तोल गेला आणि भीषण अपघात झाला.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून अपघाताचा पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.